सातारा -निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सातारा शहरात बुधवारी दिवसभर पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. महामार्गावर पावसामुळे पाणीच पाणी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जोरदार वारे व पावसामुळे शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेले तर काही ठिकाणी झाडे पडली. अनेक ठिकाणी वीजपुरवठा बराच वेळ खंडित झाला होता. निसर्ग वादळामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सावधानतेचा इशारा दिल्याने नागरिकांनी खबरदारी घेतली. बुधवारी सकाळपासून वाऱ्यासह पावसाने सुरुवात केली. दुपारी दीडनंतर पावसाचा जोर वाढला होता. कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची धावपळ उडाली. सदरबझार परिसरातील रामकुंड येथे जनावरांच्या शेडवर झाड पडले. बॉम्बे रेस्टॉरंट चौकात सर्व्हिसिंग सेंटरचे पत्रे उडून गेले. अनंत इंग्लिश स्कूल परिसर, मंगळवार पेठ, सिव्हिल हॉस्पिटल रोड येथे झाडांच्या फांद्या पडल्या. याची माहिती मिळताच सातारा पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने रस्ता मोकळा करण्याचे काम हाती घेतले. शहरातील काही भागाचा वीजपुरवठा दिवसभर खंडित झाला होता. बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरातील दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली होती.