कराड/पाटण -करोनाचे संकट आ वासून उभे असताना निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कराड व पाटण तालुक्यालाही जोरदार पावसाचा तडाखा बसला. वादळी वारे आणि मुसळधार पावसाने अनेक महाकाय वृक्ष उन्मळून पडले तर अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेकांच्या घरांवरील पत्रेही उडून गेले. कराड व पाटण तालुक्यांना बुधवारी पहाटेपासून वादळी वारे व मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे कराड-पाटण तालुका हडबडून गेला आहे. पावसाळ्यापूर्वीच आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. निसर्गच्या प्रभावामुळे पाटण तालुक्यात नुकसान होण्याची शक्यता असल्याने शासकीय विभागांनी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले होते. यात महाबळेश्वर, जावळी, वाई आणि पाटण या तालुक्यांचा समावेश होता. मंगळवारी रात्री व बुधवारी पहाटेपासून जोरदार वारे, मुसळधार पावसाने कहर केला. त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. पाटण तालुक्यात कोयना, तारळी, ढेबेवाडी, मल्हारपेठ, चाफळ परिसराला पावसाचा तडाखा बसला. अनेक ठिकाणी विजेचे खांब व झाडे उन्मळून पडली. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक ठिकाणी वीज गायब झाली होती. कराड तालुक्यात उंब्रज, तांबवे, रेठरे, उंडाळे, कार्वे, मसूर या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. रेठरे खुर्द, उंब्रज भागात झाडे कोसळली व घरांचे पत्रे उडाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. कराड विमानतळ परिसरात कामगारांच्या झोपड्यांवर बाभळीचे झाड कोळल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे.