नगर – अतिवृष्टीचा 1 हजार 343 शेतकर्यांना फटका पावसात ७४५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

नगर – जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सलग झालेल्या सततच्या पावसासह अतिवृष्टीचा श्रीगोंदा व नगर तालुक्यातील सुमारे 1 हजार 343 शेतकर्यांना फटका असला असून 745 हेक्टर क्षेत्रावरील कांदा, सोयाबीन, कापूस, मका व तूर या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात 33 टक्क्यापेक्षा जास्त नुकसान 1 हजार 148 शेतकर्यांचे झाले आहे.
दि. 23 ते 25 सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात झालेल्या सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे श्रीगोंदा व नगर तालुक्यातील शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार केला आहे. या सततच्या पावसासह अतिवृष्टींने जिल्ह्यात केवळ श्रीगोंदा व नगर तालुक्यातील पिकांचे नुकसान झाले आहे. दि. 24 व 25 सप्टेंबर या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे श्रीगोंदा तालुक्यातील तीन गावामधील 767 शेतकर्यांच्या 350 हेक्टर क्षेत्रावरील कांदा, सोयाबीन, कापूस, मका, तूर या पिकांचे नुकसान झाले आहे.
या सर्व शेतकर्यांचे 33 टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवाह आहे. तर नगर तालुक्यात (दि. 24) सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमध्ये 6 गावातील 156 शेतकर्यांच्या 80 हेक्टर क्षेत्रातील कांदा, सोयाबीन, कापूस, मका, तूर या पिकांचे नुकसान झाले आहे. सततच्या पाऊस हा दि. 23 ते 25 सप्टेंबर असा सलग तीन दिवस झाल्याने नगर तालुक्यातील 1 गावाला त्याचा फटका बसला असून या गावातील 420 शेतकर्यांच्या 315 हेक्टर क्षेत्रावरील कांदा, सोयाबीन, तूर या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात 33 टक्क्यापेक्षा जास्त 225 शेतकरी असून त्यांचे 190 हेक्टर क्षेत्र आहे. तर 33 टक्क्यापेक्षा कमी 195 शेतकरी असून त्याचे क्षेत्र 125 हेक्टर आहे.
जिल्ह्यात पावसामुळे 31 घरांची अशंतः पडझड झाली असून चार जनावरे दगावली आहेत. घरामध्ये नगर तालुक्यात 1, जामखेड 2, नेवासा 4, पारनेर 14, संगमनेर 2, श्रीरामपूर 3, राहाता 1 अशा 31 घरांची पडझड झाली असून दोन मोठी जनावरे त्यात कर्जत व संगमनेर तर दोन लहान जनावरांमध्ये राहुरीचा समावेश आहे.





