Alephata News : अतिवृष्टीचा फटका, उसाचे वजन घटले; भीमाशंकर, विघ्नहर कारखान्यांची धुराडी लवकरच बंद होण्याच्या मार्गावर
Alephata News : शेतात उसाला मोठ्या प्रमाणात तुरे आले, ज्यामुळे उसाची वाढ चांगली दिसत असली तरी प्रत्यक्षात त्यातील वजनावर परिणाम झाला.

आळेफाटा : यंदाच्या साखर हंगामात उसाच्या सरासरी वजनात मोठी घट झाल्याने उत्तर पुणे जिल्ह्यातील साखर उद्योगाला अनपेक्षित फटका बसला आहे. मुसळधार पाऊस आणि हवामानातील बदलांमुळे उसाचे एकरी उत्पादन घटल्याने या भागातील प्रमुख भीमाशंकर आणि विघ्नहर सहकारी साखर कारखान्यांचे गाळप महिना अखेरीस संपण्याची चिन्हे आहेत.
मागील वर्षी मे महिन्यापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे उसाच्या पिकावर विपरीत परिणाम झाला. शेतात उसाला मोठ्या प्रमाणात तुरे आले, ज्यामुळे उसाची वाढ चांगली दिसत असली तरी प्रत्यक्षात त्यातील वजनावर परिणाम झाला. यंदा उसाचे सरासरी उत्पादन अवघे ४० ते ४२ टन प्रति एकर इतकेच भरत आहे. अपेक्षित प्रमाणात ऊस उपलब्ध होत नसल्याने कारखान्यांसमोर गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
यंदा गाळप हंगाम वेळेत सुरू झाला असला तरी खासगी कारखान्यांच्या वाढत्या संख्येमुळे उसासाठीची स्पर्धा तीव्र झाली आहे. या स्पर्धेचा थेट फटका सहकारी कारखान्यांना बसत असून, त्यांना गतवर्षीच्या तुलनेत कमी ऊस उपलब्ध होत आहे. अनेक सहकारी कारखान्यांचे गाळप उद्दिष्ट यंदा अपूर्ण राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, हंगाम लवकर आटोपल्याने कामगार आणि वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होणार आहे. उसाच्या घटत्या वजनाने साखर उद्योगासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले असले तरी ही वेळ पिकपद्धतीत बदल करण्याची संधी म्हणून पाहिली जात आहे.
ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांची पाठ
यंदा शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे कल कमी झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी खोडवा ऊस काढून टाकण्याचे प्रमाण वाढल्याने त्याचा थेट परिणाम पुढील वर्षीच्या गाळप हंगामावर होण्याची भीती व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत कारखान्यांनी विभागनिहाय शेतकरी मेळावे घेऊन ऊस लागवडीसाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. तसेच आकर्षक योजना आणि तांत्रिक मार्गदर्शन वाढवण्याची आवश्यकता उद्योगतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
शाश्वत उत्पादनासाठी व्यवस्थापनावर भर
पुढील हंगामात चित्र सुधारण्यासाठी सुधारित ऊस वाणांचा अवलंब करणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापनावर भर देणे आणि आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. शेतकरी आणि कारखाना यांच्यातील समन्वय वाढवून जमिनीचा पोत सुधारण्याकडे लक्ष दिल्यास साखर उद्योगाला पुन्हा नवसंजीवनी मिळू शकते, असा विश्वास कृषी क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.





