Pune District : बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात पावसाची दमदार हजेरी
Pune District : सोमवारी दुपारपासून बारामतीच्या पश्चिम भागात पावसाने दमदार पुनरागमन करत जोरदार सुरुवात केली आहे.

वडगाव निंबाळकर : बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात काही दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली होती.मात्र त्यानंतर पुन्हा काही दिवस विश्रांती घेतल्याने शेतकरी चिंतेत पडले होते.खरीप हंगामातील पेरण्या,मशागतीची कामे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा गंभीर बनू लागला होता.
अशातच आषाढी वारीच्या पालख्या भक्तिभावाने पंढरपूरच्या दिशेने पुढे सरकत असताना,त्यांच्या पाठीमागून जणू निसर्गानेही कृपावृष्टीचा आशीर्वाद दिला आहे. सोमवारी दुपारपासून बारामतीच्या पश्चिम भागात पावसाने दमदार पुनरागमन करत जोरदार सुरुवात केली आहे.
पावसाच्या अभावामुळे रखडलेली शेतीची कामे आता वेगाने सुरू होण्याची चिन्हे आहेत.खरीप हंगामातील पेरणी,मशागत,खतांची पेरणी तसेच इतर शेती कामांना चालना मिळणार असून शेतमजूर आणि कष्टकरी वर्गालाही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल.
गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या अनेक गावांमध्ये जाणवत होती.विहिरी,बोअरवेल आणि इतर जलस्रोतांची पाणीपातळी घटली होती.ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात मार्गी लागण्याची शक्यता आहे.जनावरांच्या चाऱ्याच्या समस्येलाही मोठा दिलासा मिळणार आहे.
यंदाचा खरीप हंगाम चांगला जाईल,शेतीला बळ मिळेल आणि ग्रामीण अर्थचक्राला गती मिळेल,असा विश्वास शेतकरीवर्ग व्यक्त करत आहेत.आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात झालेल्या या कृपावृष्टीमुळे परिसरात भक्ती आणि आनंदाचा दुहेरी संगम अनुभवायला मिळत आहे.





