नगर । भंडारदरा परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी; आदिवासी भागातील जनजीवन विस्कळीत

राजूर -भंडारदरा परिसरात आज दिवसभर पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने आदिवासी जनजीवन विस्कळीत झाले. याभागातील चेरापुंजी समजली जाणारी भात पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. थंडी वाऱ्यामुळे जनावरेही गारठले आहे. असाच पाऊस पडत राहिला तर जनावरे दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. आज भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 95 टक्के झाल्याने तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान चांगल्या प्रकारे होत आहे. जलाशय परिचलन सूचीनुसार पाणीपातळी नियंत्रित ठेवणेकरीता भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आले असून, 5270 क्यूसने विसर्ग प्रवरा नदी सोडला आहे.
निळवंडे धरणात पाणी जमा होत असून, पाण्याची आवक वाढल्यास अजून जादा पाणी सोडण्यात येईल, असे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी सांगितले. शनिवारी सकाळपासून पुन्हा संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे ओढे, नाले पुन्हा दुथडी भरून वाहू लागले. धरणामधून पाणी सोडण्यात आल्यामुळे निळवंडे धरणाचा पाणीसाठा वाढत असून, धरण 70 टक्के भरले आहे. धरणाचा पाणीसाठा 5 हजार 900 दशलक्ष घनफूट झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये भंडारदरा येथे 102 मिमी पावसाची नोंद झाली असून, घाटघर येथे 110 मिमी, तर पांजरे 105 मिमी, रतनवाडी 115 मिमी पाऊस नोंदवला गेला.





