Pune District : अतिवृष्टीचा शेतीला मोठा फटका
Pune District : जुलै महिन्याच्या सुरुवातीला तसेच मध्यंतरी खेड तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. काही गावांमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतजमिनी, शेतीचे बांध, उभी पिके तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

राजगुरूनगर : खेड तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीचा शेतीला मोठा फटका बसला असून, तालुक्यातील 43 गावांमधील 782 शेतकर्यांच्या 198.76 हेक्टर क्षेत्राचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला असून, शासन निर्णयानुसार संबंधित शेतकर्यांना मदत देण्यासाठी 16 लाख 89 हजार 460 रुपयांची मदत अपेक्षित असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी गणेश विश्वे व विठ्ठल राऊत यांनी दिली.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला तसेच मध्यंतरी खेड तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. काही गावांमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतजमिनी, शेतीचे बांध, उभी पिके तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाच्या निकषानुसार 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे कृषी विभागाकडून करण्यात आले आहेत.
फळपिके वगळता जिरायती पिकांखालील 126 गावांमध्ये 1 हजार 557 शेतकर्यांचे 430.97 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तसेच फळपिके वगळता बागायती पिकांखालील 50 गावांमधील 428 शेतकर्यांच्या 179.84 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.फळपिकांखालील 15 गावांमध्ये 27 शेतकर्यांचे 15.61 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, या सर्व नुकसानीपोटी शासन निर्णयानुसार देय असलेल्या मदतीसाठी सुमारे 70 लाख 71 हजार 750 रुपयांचा नुकसान अहवाल कृषी विभागाने शासनाकडे सादर केला आहे.
अतिवृष्टीमुळे भात रोपवाटिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील 43 गावे बाधित झाली असून, 782 शेतकर्यांच्या 198.76 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यांतून स्पष्ट झाले आहे. या नुकसानीपोटी शासन निर्णयानुसार 16 लाख 89 हजार 460 रुपयांच्या मदतीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकर्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. कृषी विभागाने नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करून मदतीचा अहवाल शासनाकडे सादर केला असला, तरी प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
गाळ साचलेल्या 133 हेक्टर शेतीचे नुकसान
जुलै महिन्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतजमिनींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील 143 गावांमधील 1 हजार 29 शेतकर्यांच्या 133.11 हेक्टर क्षेत्रात गाळ साचला आहे. या नुकसानीची रक्कम 23 लाख 96 हजार 40 रुपये असल्याचे पंचनाम्यांतून समोर आले आहे.पुराच्या पाण्यामुळे तसेच अतिपावसामुळे जमीन खरडून जाण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात घडले आहेत. यामध्ये 4 हजार 268 शेतकर्यांच्या 778.97 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून, या नुकसानीची रक्कम 3 कोटी 66 लाख 11 हजार 668 रुपये असल्याचे कृषी विभागाच्या पंचनाम्यांतून स्पष्ट झाले आहे.
खेडमध्ये सरासरी 730 मिलिमीटर पाऊस
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, खेड तालुक्यात 1 जून ते 11 ऑगस्टदरम्यान सरासरी 730 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील 11 कृषी मंडलांमध्ये पावसाची नोंद घेतली जाते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत अधिक पाऊस झाला असून, ऑगस्ट व सप्टेंबर हे पावसाचे आणखी दोन महत्त्वाचे महिने बाकी आहेत.
कृषी मंडलनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)
वाडा – 711
राजगुरूनगर – 337
कुडे – 1,191
पाईट – 1,165
चाकण – 1,143
आळंदी – 468
पिंपळगाव तर्फे खेड – 436
कनेरसर – 274
कडूस – 569
वेताळे – 606
करंजविहीरे – 1,129





