झाड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
खडकी – गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकी परिसरात अनेक ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या. तसेच शाळा व व्यापारी संकुल परिसरात अनेक ठिकाणी गुडघाभर पाण्याचे तळे साठले असून रस्त्यावर मोठ्या प्रमात खड्डे पडले आहेत. सोमवारी रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर मंगळवारी रात्री ही धुवाधार पावसाने हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले.
रात्री 8 वाजता प्रारंभ झालेला मुसळधार पाऊस पहाटे 6 पर्यत चालूच होता. तब्बल 10 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकी, बोपोडी परिसरात जागो जागी गुडघाभर पाण्याचे तळे साठले होते. पाण्यातून वाहने चालविताना अनेक वाहने पाण्यात अडकून नादुरुस्त होण्याचे प्रकार घडले. बोपोडी किर्लोस्कर कंपनीसमोर व अंडी उबवणी केंद्रा शेजारील रेंजहिल्सकडे जाणाऱ्या मार्गावर झाडे कोसळ्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होऊन त्याचा सामना नागरिकांना करावा लागला.
मुळा रोड परिसरात काही सोसायट्यामध्ये पाणी शिरल्याने रहिवासियांचे हाल झाले. खडकी कॅंन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्नल भगत शाळेच्या प्रांगणात गुडघाभर पाणी साठल्याने शालेय विद्यार्थी व शिक्षक वर्गाना आज शाळेत येताना व जाताना तारेवरची कसरत करावी लागली. व्यापारी संकुल परिसरात ही मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने व्यापारी, ग्राहक व नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. चारचाकी वाहनात अडकलेल्या तिघांची अग्निशामक दलाने सुखरुपरित्या सुटका केली.
मुसळधार पाऊसामुळे अंडी उबवणी केंन्द्रा शेजारील रेल्वे बोगद्या खाली कमरेपर्यत पाणी साठले होते. रात्रीच्या वेळी या मार्गावरुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक वाहने पाण्यात अडकली होती. रात्री 12 वाजता रेल्वे बोगद्याखालील पाण्याचा अंदाज न आल्याने एक आलिशान कार नादुरुस्त झाली.वाहनाचे दरवाजे व खिडकी ही लॉक झाल्याने आत बसलेल्या नागरिकांना बाहेर पडण्यास अडचण निर्माण झाली. नागरिकांनी त्वरित खडकी कॅंन्टोन्मेंट अग्निशामक दलास हा प्रकार कळविला. त्याच मार्गावर एक मोठे झाड कोसळल्यामुळे अग्निशामक दलास पुढे जाण्यास अडचण निर्माण झाली. अखेर पथकातील कर्मचारी महादेव बडेकर, शंकर वाल्मिकी, प्रकाश सिरसवाल, राहुल गवारे, अभिजीत दौंडकर व गणेश चौधरी आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळापर्यंत येऊन दोरीच्या सहाय्याने बोगद्यात साठलेल्या पाण्यात उतरून चारचाकी वाहनाची खिडकी उघडली आणि वाहनचालक व इतरांची सुटका केली.