मंगळवारी पहाटेनंतर रात्रीही जोरदार तडाखा
पुणे – परतीच्या वाटेवर असलेल्या पावसाने मंगळवारी पहाटेपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. मंगळवारी मध्यरात्री तडाखा देणाऱ्या पावसाने दिवसभर विश्रांती घेतली. त्यानंतर रात्री साडेआठ-नऊ वाजेनंतर पाऊस अक्षरश: “पेटून उठला’ आहे.
सोमवारी दिवसभर प्रचंड उकाड्यानंतर मंगळवारी मध्यरात्री रात्री 12 ते 12.30 वाजल्यापासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. रात्री दीड वाजेनंतर हा जोर वाढला आणि तो पहाटेपर्यंत सुरू होता. त्यामुळे शहरातील रस्ते आणि सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्यांची धांदल उडाली. त्यानंतर दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. आर्द्रतेत वाढ झाली. त्यामुळे उकाडाही वाढला. दिवभरात ढग हटले, परंतु सायंकाळी पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे तर, येरवडा, पाषाण आणि गुरुवार पेठेतील चर्चजवळ झाडे पडिची घटना घडली. तसेच, येरवडा, धनकवडी आणि आंबेगावसह इतर भागांत नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली.
दरम्यान, पश्चिम किनारपट्टीवरील कर्नाटक आणि केरळ भागात पुन्हा एकदा ढगाची दाटी निर्माण झाली आहे. त्यातच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे क्षेत्र आंध्र प्रदेशकडे सरकत असून येत्या एक ते दोन दिवसांत मध्य भारताकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढू शकतो, असे ही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.