जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचे गंभीर सावट

पुणे – परतीच्या पावसाने जिल्ह्यात अक्षरश: कहर केला आहे. द्राक्ष बागांसह मका, सोयाबीन, भात, बाजरी, ज्वारी, कडधान्य, कांदा, बटाटा आदी पिकांचे कोट्यवधींचे नुकसान आतापर्यंत झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. ऐन दिवाळीत कोसळलेल्या संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. राजकीय नेते नुकसानग्रस्त भागास भेट देऊन दिलासा दिला. असला तरी अद्यापही नुकसानीचे म्हणावे तसे पंचनामे झाले नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात सर्वत्र पावसाच्या लहरीपणा शेती क्षेत्रावरील गंभीर संकटाची चाहूल देणारा ठरला. यंदाची परिस्थिती तर आणखी कठीण आहे. आधी दुष्काळाने होरपळलेल्या बहुतांश भागात आता ओल्या दुष्काळाचे गंभीर सावट उभे असून या अस्मानी संकटातून मार्ग काढण्याचे मोठे आव्हान सर्वासमोरच उभे ठाकले आहे.

यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने पीक चांगले बहरले. यामुळे दिवाळी उत्साहात साजरी होईल, अशी स्थिती असताना परतीच्या पावसाने सारे काही उद्‌ध्वस्त केले. कोणतेही पीक त्यातून वाचले नाही. सततच्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तयार होण्याच्या मार्गावर असणारे भात पीक आडवे झाले. बाजारात विकायला नेलेला, शेतात काढून ठेवलेला सोयाबीन पावसाच्या तडाख्यात सापडला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी दोन ते तीनवेळा कांद्याचे उळे टाकूनही वाया गेले. ज्यांचे वाचले, त्यांनी लागवड केलेला कांदा परतीच्या पावसाने धुवून काढला. टोमॅटो शेती जमीनदोस्त झाली. लष्करी अळीमुळे आधी पेरणी केलेला मका खराब झाल्यावर अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली होती. मात्र, पावसाने मका पिकाची कणसे काळी पडून त्यांना कोंब फुटले. बाजरी, ज्वारी, कडधान्य आदींची यापेक्षा वेगळी स्थिती नाही. खरीप हंगामातील मका, बाजरी, सोयाबीन अशा सर्वच पिकांचे वारेमाप नुकसान झाले. पावसामुळे मका, बाजरीचा चाराही सडून गेल्याने चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने – 
अवकाळी पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी तातडीची मदत म्हणून 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत शनिवारी (दि. 2) घेण्यात आला. मात्र, राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही 10 हजार कोटींची रक्‍कम तोडकी असून शासनाने नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा जणू घाटच घातला आहे का? असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

द्राक्ष उत्पादक झोपला – नारायणगाव परिसरात फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागा पावसामुळे कुजून गेल्या आहेत. मणी धरलेल्या अवस्थेतील बागांमध्ये पाऊस, वादळाने घडांची नासाडी झाली आहे, तर छाटणी झालेल्या पोंगा अवस्थेतील बागांमध्ये घड जिरण्याचे प्रमाण खुप आहे. डाउनी रोगाचे प्रवाण वाढत आहे, त्यामुळे फवारणीचा खर्च चारपटीने वाढला आहे. तर तयार असलेल्या बागांचे पूर्णत: नुकसान झाले असून अनेक द्राक्षबागांमध्ये आजही तळे साचल्याची स्थिती आहे. त्यामुळे जादा उत्पादनाची आशा बाळगून असलेल्या द्राक्ष उत्पादकांचे स्वप्न परतीच्या पावसाने धुळीस मिळवले आहे.

हमीभावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर – केवळ कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ या दोहोंच्या चक्रातून सुटका होऊन भागत नाही, तर आपण घेतलेल्या पिकाला बाजारभाव मिळणार काय, हा कळीचा मुद्दा ठरतो. यंदा ऐन दिवाळीत झेंडूच्या फुलांचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांना फुले अक्षरश: रस्त्यावर फेकून द्यावी लागली. त्यामुळे हमीभावाचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे.

कीडरोगांचे प्रमाणही वाढले – 
द्राक्ष, पेरू, अंजीर, सीताफळ, लिंबू या फळपिकांसह खरीप हंगामातील मका, सोयाबीन, भात, बाजरी, बटाटा, कांदा, भुईमूग ही खरीप पिकेही मातीमोल झाल्याचे दृश्‍य ठिकठिकाणी पहायला मिळते. पालेभाज्या, टोमॅटो व अन्य भाजीपाल्याबरोबरच झेंडू, शेवंतीसारख्या फुलांचीही यात वाताहत झाली आहे, तर नुकसानीचा आकडा प्रत्यक्षात कितीतरी मोठा असू शकतो. दुसरीकडे मध्येच ढगाळ, उष्ण, पाऊस अशा वातावरणामुळे कीडरोगांचे प्रमाणही वाढल्याने दुष्काळात तेरावा… अशी अवस्था आहे.

सत्तेचे संधिसाधू राजकारण – 
राजकारण्यांसाठी निवडणुकीतील दहा रुपयातली थाळी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या ताटात त्याची आसवे पडत असताना सत्तेचे संधिसाधू राजकारण पाहण्यात आणि दाखवण्यात जवळपास सगळेच मश्‍गुल आहेत. सत्तेच्या आकड्यांची जुळवाजुळव करणाऱ्यांचे तोंडदेखले हेवेदावे दाखवले जात असतानाच राज्यात सारे कसे आलबेल आहे? असे चित्र जाणीवपूर्वक रंगवले जात असल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.