Mumbai Rain Alert Update| मुंबईत काल रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. तर मुसळधार पावसामुळे लोकल सेवा देखील ठप्प झाली आहे. आजही सकाळपासून मुंबईत पाऊस सुरू असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी, मुंबईतील सर्व BMC, सरकारी आणि खाजगी शाळा आणि महाविद्यालयांना पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आजही हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली असल्याने परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सत्रांसाठीचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, पावसामुळे दादर, सायन, माटुंगा येथे पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. तसेच भांडुप, सायन येथे रेल्वे रुळांवरही पाणी आले आहे. त्यामुळं मध्य रेल्वे व हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. मुंबई महानगरात सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गतही मुसळधार पाऊस रायगड जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. तसेच मुसळधार पाऊस बरसत असल्याने आज जिल्हा प्रशासनाने रायगड – अलिबाग व मुरुड तालुक्यातील शाळा, महाविद्यालयाना सुट्टी जाहीर केली आहे. अलिबाग मुरुड तालुक्यात काही भागात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय सिंधुदुर्ग आणी रत्नागिरी जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने येथे खबरदारीची पाऊले उचलली जात आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देखील शाळा सोमवारी बंद राहणार आहेत. हेही वाचा : राज्यातील वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ; तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ