Satej Patil : गोकुळच्या अध्यक्ष निवडीआधी कोल्हापुरात मोठा पोलीस बंदोबस्त! सतेज पाटील म्हणाले, ‘आमचे सर्व संचालक…’
Satej Patil : शासनाच्या या निर्णयावर सतेज पाटील यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. काल या निर्णयाचा निषेध म्हणून कोल्हापूरात संघर्ष मोर्चा काढण्यात आला होता.

Satej Patil : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. गोकुळच्या २५ संचालक पदांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने १३ जागांवर विजय मिळवला.
मात्र, अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक असलेला १४ सदस्यांचा कोरम पूर्ण होत नसल्याने अध्यक्ष निवडीचा पेच निर्माण झाला होता. त्यानंतर शासनाने चार सदस्यांची नियुक्ती केली. या सदस्यांना अध्यक्ष निवडणुकीत मतदानाचा अधिकारही देण्यात आला आहे.
शासनाच्या या निर्णयावर सतेज पाटील यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. काल या निर्णयाचा निषेध म्हणून कोल्हापूरात संघर्ष मोर्चा काढण्यात आला होता. आज, १० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.
‘न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान राखून निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार‘ (Satej Patil)
यावेळी बोलताना सतेज पाटील म्हणाले, “महाराष्ट्रातील जनतेने काल रस्त्यावर उतरून आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा पूर्ण सन्मान राखत गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार आहोत.”
तसेच आमचे सर्व संचालक आजच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्त्यांनी कोणताही गोंधळ न करता पूर्ण शांतता राखावी, असे आवाहनही त्यांनी केले. येत्या २४ तारखेला यासंदर्भातील पुढील रणनीती जाहीर केली जाईल, असेही सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.
गोकुळ चौकाला पोलीस छावणीचे स्वरूप (Satej Patil)
दरम्यान, गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील गोकुळ चौक परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सुमारे ६०० पोलीस कर्मचारी आणि राज्य राखीव पोलीस दलाचे १०० जवान तैनात करण्यात आले आहेत.
समविचारी आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते आमनेसामने येऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
आजच्या महत्त्वपूर्ण अध्यक्षपदाच्या निवडीसाठी २५ संचालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आज गोकुळच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होणार, याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.





