पुणे जिल्हा | वरकुटे खुर्द येथे नीरा डावा कालव्याला भगदाड

इंदापूर, (प्रतिनिधी) –रात्री अचानक पाणी वाढल्याने नीरा डावा कालव्याला भगदाड पडून हजारो लिटर पाणी शेतकर्यांच्या उभ्या पिकात घुसून मोठे नुकसान झाले. एका शेतकर्याच्या घरात पाणी घुसल्याने भिंत पडून एक जण जखमी झाल्याची घटना वरकुटे खुर्द (ता. इंदापूर) येथे घडली आहे. घराची भिंत अंगावर पडलेल्या मच्छिंद्र पांडुरंग भोंगळे (वय 65) असे जखमी झालेल्या शेतकर्याचे नाव आहे.
मंगळवारी 8 ऑक्टोबरला मध्यरात्री वरकुटे खुर्द गावच्या हद्दीत भोंगळेवस्ती या ठिकाणी कालव्याचे पाणी अचानक वाढल्याने बुधवारी भगदाड पडून पाणी शेतकर्यांच्या उभ्या पिकांमध्ये घुसले. यामध्ये वीसहून अधिक शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.
यामध्ये राजकुमार भोंगळे यांचे लागवड केलेले पेरूची रोपे वाहून गेली. हनुमंत व मच्छिंद्र भोंगळे यांची मका पीक कणसे काढून शेतात ठेवली होती ती वाहून गेली.
उत्तम शिंदे यांच्या शेडनेटमधील ढोबळी मिरची, साईनाथ भोंगळे यांची मका, पिराजी भोंगळे यांचे ड्रॅगन फ्रूट, अॅड. संदीप शेंडे यांचे काढणीस आलेली मका, दशरथ भोंगळे यांचे कारले,
वसंत भोंगळे यांची काकडी, संजय शेंडे यांची चवळी, रामदास शेंडे यांच्या केळी, तर कांतीलाल व गुलाब भोंगळे यांचे डाळिंब, भगवान शेंडे यांचे डाळिंब या शेतकर्यांसह इतरही अनेक शेतकर्यांच्या तरकारी फळबागाचे मोठे नुकसान झाले आहे.
कालव्याला भगदाड पडल्याची माहिती गावचे सरपंच बापूराव शेंडे यांनी जलसंपदा विभागाला दिल्यानंतर जलसंपदा विभागाने वरिष्ठ कार्यालयाला सांगून निरा डावा कालव्याचे पाणी वरकुटे खुर्द गावच्या वरच्या बाजूला अडवण्याचे काम ताताडीने सुरू केले.
वरकुटे खुर्दचे गाव कामगार तलाठी नितीन यादव यांनी घटनास्थळी येऊन नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या पिकांचे व तनगर पडून जखमी झालेले मच्छिंद्र भोंगळे यांच्या घराचे व पिकाचे पंचनामा केला असून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करुन ते वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवल्याचे सांगितले.
कालव्यातील पाण्याने भगदाड पडल्याची माहिती मिळताच पाण्याचा विसर्ग कमी करून वरच्या बाजूला पाणी वळवून अडविण्यात आले आहे. फुटलेल्या कालव्याची दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे.-विक्रम गायकवाड, शाखाधिकारी जलसंपदा निमगाव केतकी


