शिवशंकर निरगुडे
हिंगोली – जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथे 1 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश पाऊस झाला. यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन कापूस पिके जमीनदोस्त झाले आहेत.
सुमारे दोन तास पडलेल्या या मुसळधार पावसामुळे साखरा ते केलसुला येथील राज्य रस्त्यावरील पूल देखील तुटल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. यामुळे वाहनांच्या लांबच रांगा लागल्या आहेत. तसेच साखरा येथील पूलावरुन दोन गायीही वाहून गेल्या आहेत.
सेनगाव तालुक्यातील साखरा हिवरखेडा बोरखेडी होलगिरा धोतरा केलसुला परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने अश्रुजी गायकवाड यांच्या शेताच्या बाजूला असलेली नदी ओसांडून वाहू लागली. यामुळे शेतातील कापसाचे व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी आता सोयाबीन व कापूस पिकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांला नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत.
याशिवाय हिवरखेडा गावातील अनेक ग्रामस्थांच्या घरातही पाणी शिरले. साखरा फाटा येथील महेश चाकोते यांच्या किराणा दुकानात पाणी घुसल्याने सामानचेही मोठी नुकसान झाले आहे. तर आठवडी बाजारात पुराचे पाणी घुसल्याने अनेक शेतकऱ्यांचा भाजीपाला वाहून गेला आहे.
“हिवरखेडा येथे 1 सप्टेंबर रोजी ढगफुटी सदृश पाऊस झाला. यात माझ्या शेतातच्या बाजूला असलेली नदी ओसांडून वाहवू लागल्याने सोयाबीन व कापसाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे माझ्या एका एकर मधील कपाशी व सोयाबीन सर्व जमिनदोस्त झाली आहे. यामुळे महसूल प्रशासनाच्या वतीने तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी” – अश्रुजी गायकवाड.