मुसळधार ! दापोलीत ढगफुटी सदृश पाऊस; कोकणात रात्रभर पावसाचे थैमान

मुंबई : राज्यात मागच्या दोन दिवसापासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यातच काल कोकणात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. दापोलीत ढगफुटी सदृश पाऊस पडला आहे. पावसाच्या थैमानाने शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले आहे.
दापोली शहरातील केळकर नाका शिवाजीनगर, भारत नगर, नागर गुडी, प्रभू आळी, जालगाव खलाटी या परिसरात पुराचे पाणी चार ते पाच फूट वाढले अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने लोकांची धावपळ उडाली आहे. दापोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री एक वाजेपर्यंत शहरातला पूर कायम होता. एक नंतर पावसाने थोडी उसंत घेतल्यामुळे पाणी ओसरले आहे.
दुसरीकडे चिपळूणमध्येही रात्रभर पाऊस कोसळत होता. त्यामुळे पुराच्या भीतीत नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी येत्या काही तासांत पाऊस असाच सुरूच राहिला तर समुद्र भरतीच्या वेळी शहरात पाणी शिरण्याची शक्यता आहे. दापोली, चिपळूणला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे पुन्हा आगमन झाले आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील चार ते पाच दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचे असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पालघर जिल्ह्यालाही अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे शहरांमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.





