Heatwave Alert – वाढत्या तापमानामुळे पुणे वेधशाळेने बुधवारी पुण्यासाठी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. पुण्यासह धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला आणि अमरावती या १२ जिल्ह्यांसाठी हा अलर्ट आहे. या भागांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा लक्षणीय वाढण्याची शक्यता आहे. मंगळवारीही पुण्यात सर्वात जास्त तापमान लोहेगावात ४३.२ अंश सेल्सियस इतके नोंदवण्यात आले. शिवाजीनगरनेही ४०.८ अंश सेल्सियसचा टप्पा पार केला. किमान तापमानात कोणतीही विशेष घट नोंदवण्यात आली ऩाही. कोरेगाव पार्कातही ४०.८ अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले. याशिवाय पाषाण ३८.६, मगरपट्टा ४१, एनडीए ३९.८, दौंड ४०.६, हवेली ४०.१, राजगुरूनगर ४०.२, माळीण ३६.५, चिंचवड ३८.९, आंबेगाव३९.९, हडपसर३९.४ असे तापमान नोंदवण्यात आले. किमान पुढील काही दिवस या उन्हाची तीव्रता कायम राहणार असून निरभ्र आकाशामुळे कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता नाही. तसेच राज्यात पुढील तीन दिवस तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून पुण्यासह मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका असल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे असे आवाहन केले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे. अनेक शहरांमध्ये तापमान ४० अंश सेल्सियसच्या जवळ आले असून विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान ४५ अंशाच्या जवळ पोहोचले आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत असून रात्रीच्या वेळीदेखील उकाड्याच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.