Heatstroke Alert – एप्रिल महिन्याच्या अखेरीसच उष्णतेची तीव्रता लक्षणीय वाढली असून, सकाळपासून कडक ऊन, दुपारी गरम वार्यांचे चटके आणि रात्रीही न उतरलेले तापमान यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. सध्याची ही परिस्थिती पुढे ‘हीटवेव’ म्हणजेच उष्माघात होण्याचा धोका वाढवणारी ठरत आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला आणि आधीपासून आजारी असलेल्या नागरिकांसाठी ही स्थिती अधिक धोकादायक मानली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, वाढत्या उष्णतेमुळे शरीरावर ताण येऊन डिहायड्रेशन, चक्कर, उलट्या आणि अशक्तपणा अशा समस्या वाढू लागतात. योग्य वेळी काळजी घेतली नाही तर ही स्थिती जीवघेण्या उष्माघातात रूपांतरित होऊ शकते. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, शरीर सामान्यतः घामाच्या माध्यमातून स्वतःचे तापमान नियंत्रित करत असते. मात्र, वातावरणातील आर्द्रता वाढल्यास घामाचे बाष्पीभवन नीट होत नाही. त्यामुळे शरीरातील उष्णता बाहेर पडत नाही आणि हायपरथर्मिया ही अवस्था निर्माण होते. पुढे हीच अवस्था उष्माघातात बदलण्याची शक्यता असते. उष्माघाताची लक्षणे म्हणून शरीराचे तापमान झपाट्याने वाढणे, घाम येणे थांबणे, तीव्र डोकेदुखी, हृदयाचे ठोके वाढणे, चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे यांचा समावेश होतो. तापमान 40 अंश सेल्सियसच्या पुढे गेल्यास धोका अधिक वाढतो. शहरांमध्ये सिमेंटच्या इमारती, वाहने आणि प्रदूषणामुळे उष्णतेचा प्रभाव अधिक तीव्र जाणवत असल्याने नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या सूचनांनुसार, उष्माघात टाळण्यासाठी शरीर हायड्रेट ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भरपूर पाणी पिणे, दुपारी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत शक्यतो बाहेर जाणे टाळणे, हलके व सैल कपडे वापरणे, तसेच बाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा कापड ठेवणे या उपाययोजना प्रभावी ठरतात. तसेच, शरीरात अस्वस्थता, चक्कर, ताप किंवा थकवा जाणवत असल्यास त्वरित सावलीत विश्रांती घ्यावी आणि शरीर थंड करण्याचा प्रयत्न करावा. लक्षणे गंभीर वाटल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.