मुंबई : होळीनंतर राज्यातील उकाड्यात वाढ होत जाते, असा एक सर्वसाधारण अनुभव, अंदाज आहे. मात्र, यंदा होळीच्या आधीपासूनच राज्यात उष्णतेचा तडाखा जाणवतो आहे. आता तर विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून तेथील पारा ४० अंशांच्या नजीक पोहोचला आहे. ब्रह्मपुरीमध्ये ४२ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर कोकण पट्ट्यामध्ये देखील तापमानवाढ झाल्याचे समोर आले आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही उकाडा चांगलाच वाढला असून दुपारी घराबाहेर पडणे नागरिकांच्या जीवावर येत आहे. भर उन्हात घराबाहेर न पडण्याचा इशारा यंत्रणा देखील देत आहेत. पुढील २४ तासांमध्ये ही स्थिती कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. चंद्रपूर, अकोला, नागपूर, वर्धा येथे कमाल तापमानात १ ते २ अंशांची वाढ अपेक्षित आहे. उत्तर महाराष्ट्र याला काही प्रमाणात अपवाद असून, येथे अद्यापही पहाटेच्या वेळी काहीसा गारठा जाणवतो आहे. दिवस माथ्यावर आल्यानंतर मात्र हा गारठा नाहीसा होऊन तपमान वाढीने नागरिक त्रस्त होत आहेत. विदर्भासह राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तपमान चांगलेच वाढते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपुरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही दिवस अकोल्यात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याची शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. दुसरीकडे विदर्भातील जवळजवळ सर्व जिल्ह्यांतील उष्णतेच्या पा-याने चाळीशी ओलांडली आहे. उष्णतेची संभाव्य लाट लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.