ह्रदयद्रावक ! डोळ्यांसमोर तलावात बुडून सख्ख्या बहिणींचा मृत्यू; आई-मोठी बहिण थोडक्यात बचावल्या

जालना – जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील आईसोबत धुणं धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. तालुक्यातील सुरुमगाव येथे ही दुर्दैवी घटना घडली. यामध्ये मुलींची आई आणि मोठ्या मुलीला वाचविण्यात यश आलं.
सुरुमगाव येथील मजूर कुटुंबातील रेणुका राजेश थोरात (37) या मोठी मुलगी मुक्ता (15), लक्ष्मी (11), श्रावणी (9) व मुलगा परशुराम (7) यांच्यासह गावालगत असलेल्या तलावावर धुणे धुण्यासाठी गेले होते. आई धुणे धूत असताना लक्ष्मी व श्रावणी या पाण्यात उतरल्या.
दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने लक्ष्मी आणि श्रावणी पाण्यात बुडू लागल्या, हे पाहून आई रेणुका व मोठी मुलगी मुक्ता त्यांना वाचवण्यासाठी तलावात उतरल्या. मात्र पाणी खोल असल्याने त्याही बुडू लागल्या. त्याचवेळी मुलगा परशुराम याने बचावासाठी आरडाओरड केली.
शेजारच्या शेतात काम करणाऱे शेतकरी शामराव लहाने हे आवाज ऐकून पाण्यात बुडत असलेल्या माय-लेकींना वाचविण्यासाठी धावत आले. त्यांनी साडीच्या मदतीने बुडत असलेल्या मुक्ता आणि रेणुखा थोरात यांना वाचवलं. मात्र लक्ष्मी आणि श्रावणी यांचा तोपर्यंत मृत्यू झाला होता.



