गर्भनिरोधक गोळ्यांमुळे वाढतो हृदयविकाराचा धोका!

हृदयविकाराचा धोका कमी कसा करता येईल?

गर्भनिरोधक गोळ्या (OCP किंवा संप्रेरकांचा अंतर्भाव असलेली संततीनियमनाची इतर कोणतीही साधने म्हणजे निरोगी आणि तरुण स्त्रियांसाठी गर्भारपण टाळण्यासाठीचा सर्वाधिक सोयीस्कर व सुरक्षित मार्ग असतो. यातील काही स्त्रियांना मात्र हृदयविकार, हार्टअटॅक, स्ट्रोक्‍स आणि रक्तात गुठळ्या होणे अशाप्रकारच्या गंभीर समस्यांचा धोका असू शकतो. त्यामुळे संततीनियमनासाठी डॉक्‍टरांच्या सल्ल्याने, त्यांनी सांगितलेली पद्धत वापरणेच योग्य. स्वत:हून अशाप्रकारच्या उपाययोजना करणे कोणत्याही परिस्थितीत टाळायलाच हवे!

गर्भनिरोधक गोळ्यांमुळे हृदयविकाराचा धोका का वाढतो?
नावाप्रमाणेच इस्ट्रोजन आणि प्रेजेस्टिन अशी संप्रेरके ही या गोळ्यांतील प्रमुख घटक असतात. ही संप्रेरके हृदयाला अनेक प्रकारे हानी पोहोचवू शकतात. त्यांच्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल, तर आपला रक्तदाब दर सहा महिन्यांतून एकदा तपासून पाहण्याची काळजी घ्यायला हवी व तो योग्य पातळीवर राहील यासाठी प्रयत्न करायला हवेत. आधीच उच्च रक्तदाबाचा त्रास असेल, तर शरीराला अधिक चांगल्या प्रकारे लागू होऊ शकेल, अशी संततीनियमनाची दुसरी एखादी अधिक सुरक्षित पद्धत आहे का, याबद्दल आपल्या डॉक्‍टरांशी चर्चा करा. गर्भनिरोधक गोळ्या घेणाऱ्या स्त्रियांच्या रक्तातील हृदयविकाराला कारणीभूत ठरणाऱ्या स्निग्धांशांची पातळी बदलत असल्याचे दिसून येऊ शकेल.

शरीरातील HDL गुड कोलस्टेरॉलची पातळी खाली गेलेली दिसेल; त्याचवेळी ट्रायग्लिसराइड्‌स आणि LDL बॅड कोलस्टेरॉलची पातळी वाढलेली दिसेल. यामुळे हळूहळू धमन्यांच्या आतल्या बाजूस प्लाक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चरबीयुक्त पदार्थाचा थर साठत जाईल.

कालांतराने या प्लाकमुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी होईल किंवा त्यात अडथळा निर्माण होईल व त्यातून हार्टऍटॅक किंवा अन्जायना (छातीत दुखण्याचा एक प्रकार) यांसारखी समस्या निर्माण होईल. गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये असलेल्या एस्ट्रोजनमुळे रक्तात गुठळ्या होण्याचा धोकाही वाढू शकतो!

गर्भनिरोधक गोळ्या घेत असल्यास खालील स्थितींमध्ये हृदयविकार व अधिक गुंतागुंतीची लागण होण्याची शक्‍यता अधिक असते.
1. वय 35 वर्षाहून जास्त असल्यास.
2. रक्तदाब, मधुमेह, हाय कोलेस्ट्रोलचा त्रास असल्यास.
3. धूम्रपान करत असल्यास.
4. यापूर्वी स्ट्रोक, हार्टअटॅक किंवा रक्तात गुठळी झाल्याची घटना घडली असल्यास.
5. मायग्रेन विथ ऑराचा त्रास असल्यास.

गर्भनिरोधक गोळ्या घेत असताना हृदयविकाराचा धोका कमी कसा करता येईल?

वर दिलेल्या प्रकारांपैकी हृदयविकाराचा धोका वाढविणारी कोणतीही स्थिती लागू होत असली तरीही संततीनियमनाची साधने वापरू शकता. त्यासाठी आपल्या डॉक्‍टरांजवळ आपल्या शंका बोलून दाखवा. तुम्हाला दिल्या जाणाऱ्या संततीनियमनाच्या प्रत्येक साधनाचे फायदे-तोटे आजमावण्यात ते तुम्हाला मदत करतील.

उच्च रक्तदाब आणि मधूमेह यांसारख्या समस्या असलेल्या स्त्रियांचे हे आजार जोवर नियंत्रणात असतील, तोवर त्या सुरक्षितपणे गर्भनिरोधक गोळ्या घेऊ शकतात. रक्तात गुठळी होणे, स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा त्रास यापूर्वी कधीही झाला असेल, तर इस्ट्रोजेनयुक्त गर्भनिरोधके वापरता कामा नयेत. त्यासाठी तुमच्या डॉक्‍टरांशी बोला.

जन्मजात हृदयविकार असलेल्या स्त्रिया संततीनियमनाची बहुतांश साधने वापरू शकतात. वय कितीही असो, गर्भनिरोधक गोळ्या घेत असल्यास डॉक्‍टरांशी बोलून, संपूर्ण माहितीनिशीच आपला निर्णय घेणे आवश्‍यक!

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.