यांत्रिकीकरणाद्वारे रस्त्यांची साफसफाई: भ्रष्टाचार, तांत्रिक मुद्यांबाबत हरकत
पिंपरी – महापलिका हद्दीतील रस्ते यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याच्या 742 कोटी रुपयांच्या निविदेमध्ये प्रशासनाने परस्पर फेरबदल केले आहेत. स्थायी समिती सभा आणि सर्वसाधारण सभेपुढे सादर केलेला प्रस्ताव आणि प्रत्यक्षातील निविदेमध्ये फरक आहे. आर्थिक लागेबांधे, सातत्याने बदलेल्या अटी शर्ती, भ्रष्टाचार, नियमांचे उल्लंघन, सर्वपक्षीय राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप, कष्टकरी कामगारांवर पडणारी बेकारीची कुऱ्हाड आणि वाढीव खर्च या बाबींवरून भाजपाच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी या कामाला विरोध केला होता. सावळे यांनी लेखी स्वरुपात घेतलेल्या हरकतीबाबत उद्या सोमवार (दि. 18) मे रोजी महापालिका आयुक्तांसमक्ष सुनावणी होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 8 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या रस्त्यांची यांत्रिकीकर पद्धतीने साफसफाई करण्यासाठी 742 कोटी रुपयांचे टेंडर महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आले होते. या कामासाठी एक संयुक्त टेंडर न काढता सहा विविध “पॅकेजेस’ मध्ये विभागणी करत 8 वर्षे कालावधीसाठी टेंडर काढण्याची शिफारस या कामाचे सल्लागार मे. टंडन अर्बन सोल्युशन्स यांनी केली होती. स्थायी समिती व मनपा सर्वसाधारण सभेमध्ये आयत्या वेळीचा विषय मांडून या कामाचे टेंडर काढण्यासाठी मान्यता घेण्यात आली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी टेंडर प्रसिद्ध करण्यात आले. टेंडरमध्ये 6 पॅकेजसाठी 8 कंत्राटदारांनी आलटून पालटून सहभाग घेतल्याचे तांत्रिक छाननीतून समोर आले आहे.
आर्थिक लागेबांधे, सातत्याने बदलेल्या अटी शर्ती, भ्रष्टाचार, नियमांचे उल्लंघन, सर्वक्षीय राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप, कष्टकरी कामगारांवर पडणारी बेकारीची कुऱ्हाड आणि 97 कोटींवरून 106 कोटींवर गेलेला खर्च या मुद्यांवरून भाजपच्या नगरसेविका सावळे यांनी या कामाला आक्षेप घेतला होता. तसेच सर्वसाधारण सभेची परवानगी आणि निविदा प्रक्रियेत तफावत होती. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये बेकायदेशीर उपसूचना घुसवून यांत्रिक पद्धतीने साफसफाई कामाच्या टेंडरमध्ये केलेल्या बदलांना मागच्या दराने मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न काहीजणांनी केला.
मात्र सावळे यांनी याला विरोध करत हा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर आयुक्त श्रवण हर्डीकर यांनी सावळे यांनी घेतलेल्या हरकतीची दखल घेत टेंडर प्रक्रिया स्थगित केली. मार्च महिन्यात अचानकपणे उद्भवलेल्या करोनाच्या परिस्थितीमुळे सावळे यांच्या हरकतीवर आयोजित केलेली सुनावणी दोन-तीन वेळा पुढे ढकलण्यात आली. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत असतानाच आयुक्तांनी सीमा सावळे यांनी घेतलेल्या हरकतींवर उद्या सोमवार (दि. 18) मे रोजी आयुक्त कक्षात सुनावणी होणार आहे.