Health Tips: कधी कधी झोपेतून किंवा बसलेल्या अवस्थेतून अचानक उभं राहताच डोळ्यांसमोर अंधारी येते, डोकं गरगरतं किंवा तोल जातो. बहुतांश लोक हे थकवा, अशक्तपणा किंवा कमी झोप यामुळे होतं असं समजून दुर्लक्ष करतात. पण वैद्यकीय भाषेत ही स्थिती ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन म्हणून ओळखली जाते आणि ते कधी कधी गंभीर आजाराचेही संकेत असू शकते. असं का होतं? आपण अचानक उभे राहिलो की गुरुत्वाकर्षणामुळे रक्त वेगाने पायांकडे जातं. निरोगी शरीरात नर्व्हस सिस्टिम त्वरित हृदयाचे ठोके वाढवते आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्यामुळे मेंदूपर्यंत पुरेसं रक्त पोहोचतं. पण ही प्रक्रिया जर मंद झाली, शरीरात पाण्याची कमतरता असेल किंवा रक्तदाब अचानक कमी झाला, तर काही क्षणांसाठी मेंदूला पुरेशी ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे चक्कर येते. Dizzy When Standing Up उभे राहताच चक्कर येण्यामागची संभाव्य कारणं शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) रक्ताची कमतरता (अॅनिमिया) व्हिटॅमिन B12 ची कमतरता लो ब्लड शुगर रक्तदाबाच्या गोळ्या हृदयाच्या झडपांचे आजार काही वेळा पार्किन्सन्ससारखे नर्व्हस सिस्टिमचे आजार हा हृदय किंवा नसांचा इशारा तर नाही ना? जर ही समस्या वारंवार होत असेल, तर ते गंभीर असू शकते. याचा अर्थ रक्तदाब नियंत्रित करणारी शरीरातील यंत्रणा नीट काम करत नाही. सतत चक्कर येणं म्हणजे हृदयाची धडधड अनियमित असणे किंवा नसांचं नुकसान झाल्याचाही संकेत असू शकतो. यामुळे अचानक पडण्याचा धोका वाढतो, जो विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप धोकादायक ठरू शकतो. Drinking Water या समस्येपासून बचावासाठी काय कराल? हळूहळू उठा – आधी बसून घ्या, मग सावकाश उभे राहा पुरेसं पाणी प्या – दिवसभर शरीर हायड्रेट ठेवा मीठाचं संतुलन ठेवा – डॉक्टरांच्या सल्ल्याने आहारात बदल करा व्यायाम करा – पायांच्या स्नायूंना बळकट करणारे व्यायाम उपयोगी ठरतात शरीराचे संकेत ओळखा अचानक चक्कर येणं ही किरकोळ गोष्ट समजून दुर्लक्ष करू नका. काळजी घेतल्यानंतरही चक्कर येत राहिल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. गरज असल्यास टिल्ट टेबल टेस्ट किंवा रक्ततपासणी करून घ्या. लक्षात ठेवा शरीर आपल्याशी सतत संवाद साधत असतं. त्या संकेतांकडे वेळेत लक्ष दिलं, तरच आरोग्य सुरक्षित राहील.