Health Tips: उठताना, बसताना किंवा चालताना अनेकांना आपल्या हाडांतून ‘कट-कट’ असा आवाज येतो. हे अनेकदा अगदी सामान्य असतं.हा आवाज साधारणपणे आपल्या सांध्यांमध्ये असलेल्या द्रवातील (Synovial Fluid) हवेच्या बुडबुड्यांमुळे निर्माण होतो. हे बुडबुडे फुटल्यावर “कट-कट” असा आवाज होतो. परंतु, जर या आवाजासोबत दुखणं, सूज किंवा कडकपणा जाणवत असेल, तर ही बाब दुर्लक्षित करता कामा नये. कारण हे सांध्यांच्या समस्येचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. ‘कट-कट’ आवाजासोबत दुखणं का होतं? हाडांमधून आवाज येणं आणि सांधेदुखी यांचा थेट संबंध असतो. हा आवाज साधारणतः कार्टिलेज घासल्यामुळे किंवा सांध्यांतील स्नेहद्रव कमी झाल्यामुळे होतो. आवाजासोबत दुखणं आणि हालचालीत अडचण येत असेल, तर हे ऑस्टिओआर्थरायटिस (Osteoarthritis) किंवा इतर सांध्यांच्या आजारांचे लक्षण असू शकते. हाडांतून येणाऱ्या आवाजाची आणि सांधेदुखीची कारणं १. कार्टिलेज घासून जाणं सांध्यांतील हाडांच्या टोकांवर एक मऊ थर असतो ज्याला कार्टिलेज म्हणतात. तो थर हाडांना एकमेकांवर घासण्यापासून वाचवतो. वय वाढल्याने किंवा दुखापतीमुळे हा थर झिजतो आणि हाडं एकमेकांवर घासू लागतात. त्यामुळे आवाज येतो आणि गठिया (Arthritis) होण्याची शक्यता वाढते. २. लिगामेंट किंवा टेंडन ताणले जाणं कधी कधी सांध्यांच्या आसपास असलेले लिगामेंट किंवा टेंडन हलताना जागा बदलतात आणि पुन्हा जागेवर येताना आवाज होतो. हा आवाज जरा तीव्र आणि ‘चटखणारा’ असतो. हे बहुधा स्नायूंमधील ताण किंवा अतिरिक्त हालचालींमुळे घडतं. ३. सांध्यातील स्नेहद्रव (Synovial Fluid) कमी होणं सांध्यांमध्ये असणारं हे द्रव पदार्थ हाडांना गती आणि चिकटपणा देतो. त्यात कमतरता आल्यास हाडं एकमेकांवर जास्त घासतात, ज्यामुळे आवाजासोबत दुखणं आणि सूज येऊ शकते. ४. स्नायूंचं असंतुलन आणि कमजोरी कमजोर स्नायूंमुळे सांध्यांना योग्य आधार मिळत नाही. परिणामी, सांधे असामान्यरीत्या हलतात आणि चालताना, उठताना किंवा झुकताना सतत आवाज आणि वेदना जाणवू शकतात. वेळीच लक्ष देणं का महत्त्वाचं? बर्याचदा लोक हे लक्षण वृद्धापकाळाशी जोडून दुर्लक्ष करतात. परंतु सुरुवातीच्या टप्प्यातच योग्य निदान व उपचार घेतले, तर गंभीर आजार जसे ऑस्टिओआर्थरायटिस टाळता येऊ शकतात. ही माहिती विविध वैद्यकीय अहवालांवर आणि तज्ञांच्या सल्ल्यावर आधारित आहे. अशा लक्षणांचा अनुभव घेतल्यास स्वतःहून औषधं घेऊ नका हाडांच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.