Health Tips: थंडीत घशातील टॉन्सिल्स वाढणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. पण काही वेळा ही समस्या दिवसेंदिवस वाढत जाते आणि बोलणं, खाणं-पिणंही कठीण होतं. अशा वेळी काही घरगुती उपाय अवलंबून तुम्ही ही त्रासदायक समस्या सहज दूर करू शकता. हे उपाय स्वस्त, सोपे आणि प्रभावी आहेत. १. मीठ आणि हळदीचे गुळणं टॉन्सिल्समधील वेदना आणि सूज कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे कोमट खाऱ्या पाण्याने गुळणं करणं. हे पाणी घशातील जीवाणू दूर करतं आणि सूजलेले ऊतक शांत करतं. त्यात एक चिमूटभर हळद घातल्यास परिणाम अधिक चांगला मिळतो, कारण हळदीतील ‘कर्क्यूमिन’ हे नैसर्गिक दाहशामक घटक आहे. दिवसातून ३-४ वेळा असे गुळणं केल्याने घसा लगेच बरा होतो. २. हळदीचं दूध आणि मध रात्री झोपण्यापूर्वी कोमट हळदीचं दूध प्यायल्याने टॉन्सिल्समुळे होणारी जळजळ आणि सूज कमी होते. हळद अँटीबॅक्टेरियल असल्यामुळे ती संसर्गाशी लढते आणि सकाळपर्यंत आराम मिळतो. जर दूध चालत नसेल, तर एक चमचा मधात थोडी हळद मिसळून हळूहळू चाटावी. मध घशावर एक थर तयार करतो आणि खरखर व वेदना कमी करतो. ३. लिंबू आणि आलं लिंबामध्ये व्हिटॅमिन-सी मोठ्या प्रमाणात असतं, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतं. कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि थोड मध घालून प्यायल्याने घशातील आम्लता आणि सूज कमी होते. तसेच, आलं मीठासह चावून खाल्ल्यास किंवा त्याचा चहा प्यायल्यास टॉन्सिल्समधील बॅक्टेरिया नष्ट होतात. ४. तुरटी आणि लसूण तुरटीचं पाणी टॉन्सिल्सच्या सूज आणि वेदनेवर उत्तम उपाय आहे. तुरटीच्या पाण्याने गुळणं केल्याने घशातील गाठी आणि सूज कमी होते. तसेच, लसूण चावून खाल्ल्यास त्यातील ‘अलिसिन’ नावाचं द्रव्य नैसर्गिक अँटीबायोटिकसारखं काम करतं आणि टॉन्सिल्सचा संसर्ग मुळापासून नष्ट करण्यात मदत करतं. हा लेख वैद्यकीय अहवाल आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यांवर आधारित आहे. येथे दिलेले उपाय केवळ माहिती आणि जनजागृतीसाठी आहेत. टॉन्सिल्सची समस्या गंभीर किंवा दीर्घकाळ राहिल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.