Health Tips : आपण अनेकदा असा विचार करतो की पौष्टिक असलेली कोणतीही गोष्ट सकाळी उपाशीपोटी घेतली तर जास्त फायदा होईल. मात्र वैद्यकीय विज्ञान आणि आयुर्वेदानुसार सकाळच्या वेळी शरीराची पचनक्रिया खूप नाजूक असते. रात्रीच्या उपवासानंतर पोटात आम्ल (ॲसिड) जास्त प्रमाणात असते. अशा वेळी चुकीच्या पदार्थांचे सेवन केल्यास पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. काही गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या असल्या, तरी सकाळी उपाशीपोटी घेतल्यास त्या त्रासदायक ठरू शकतात. यामुळे अॅसिडिटी, गॅस, पोटदुखीच नाही तर दीर्घकाळात इन्सुलिन रेसिस्टन्स आणि आतड्यांची सूजही वाढू शकते. त्यामुळे काय खायचं याइतकंच कधी खायचं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. 1) आंबट फळे आणि फळांचे ज्यूस संत्री, मोसंबी, लिंबू यांसारखी आंबट फळे व्हिटॅमिन-सीने भरपूर असतात. पण उपाशीपोटी ही फळे खाल्ल्यास पोटात आम्ल अधिक तयार होते. फळांच्या ज्यूसमध्ये फायबर नसते आणि फक्त साखर (फ्रुक्टोज) राहते. उपाशीपोटी ज्यूस घेतल्यास लिव्हरवर ताण येतो आणि रक्तातील साखर अचानक वाढते. यामुळे थोडावेळ ऊर्जा मिळते, पण लगेच थकवा जाणवतो. 2) कॉफी अनेक लोक सकाळी उठताच कॉफी पितात. मात्र उपाशीपोटी कॉफी घेतल्याने पोटात हायड्रोक्लोरिक ॲसिड वाढते, ज्यामुळे पचनसंस्थेला नुकसान होऊ शकते. कॉफीमधील कॅफिनमुळे तणाव वाढतो, घबराट, चिडचिड आणि अस्वस्थता जाणवू शकते. तसेच शरीर अधिक डिहायड्रेट होते. 3) दही दही हे प्रोबायोटिक्सचे चांगले स्रोत मानले जाते. पण सकाळी उपाशीपोटी दही खाल्ल्यास पोटातील आम्ल दह्यातील चांगल्या बॅक्टेरियांना नष्ट करते. यामुळे दह्याचे फायदे मिळत नाहीत आणि काही लोकांना गॅस किंवा पोटात मुरडा येऊ शकतो. मग सकाळी काय खावे? सकाळची सुरुवात कोमट पाणी पिऊन करावी. त्यानंतर भिजवलेले बदाम, अक्रोड, ओट्स यांसारखे हलके आणि पचायला सोपे पदार्थ घ्यावेत. आंबट फळे, दही आणि ज्यूस हे नाश्त्यानंतर किंवा दुपारच्या जेवणासोबत घेणे अधिक फायदेशीर ठरते. शरीराची प्रकृती ओळखून योग्य वेळी योग्य आहार घेतला, तर लहानसहान सवयींमुळे मोठ्या आजारांपासून बचाव करता येतो.