पिंपरी | स्वच्छता ही सेवा उपक्रमाअंतर्गत 1450 सफाई कर्मचार्यांची आरोग्य तपासणी

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा ह्या पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या पंधरवड्यात स्वभाव-स्वच्छता, संस्कार- स्वच्छता यावर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज सफाई कर्मचार्यांचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या आरोग्य शिबिरात अ, ब, ड, ग आणि ह प्रभागातील स्वच्छता विषयक काम करणार्या संस्थांचे 1800 पैकी 1450 कर्मचार्यांची रक्त, साखर, ब्लड प्रेशर इत्यादींची तपासणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर आवश्यकतेनुसार पुढील वैद्यकीय उपचार करण्यात यणार आहेत.
या शिबिरात अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे,
आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, थेरगाव रुग्णालयाचे डॉ. राजेंद्र फिरके, भोसरी रुग्णालयाचे डॉ. शिवाजी ढगे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक आरोग्याधिकारी कुंडलिक दरवडे,
सुधीर वाघमारे, राजू साबळे, शांताराम माने, के. पी. एम. जी. संस्थेचे विनायक पदमाने, आरोग्य विभागाच्या शितल पवार तसेच आरोग्य कर्मचार्यांची उपस्थिती होती.
स्वच्छता विषयक कामकाज करणार्या अधिकारी कर्मचा-यांनी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छतेची शपथ घेतली. शपथेचे वाचन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
यावेळी कमलेश गायकवाड, विजय गाडे, राजू शेख या सफाई सेवकांचा तसेच गंगा खलसे, शिला आढाव, मंगल देवकुळे या सफाई सेविकांचा विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तर शिबिरात अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आर सी यु ई एस मधून डॉ. मुकेश कुलकर्णी आणि प्राची मेंढे यांनी विविध नागरी सामाजिक संरक्षण योजना आणि स्वच्छता कामगारांच्या आरोग्याचे महत्त्व या विषयांवर व्हिडीओ चित्रफितीद्वारे सादरीकरण केले.





