पुणे -गोवर, झिंका बाधित रुग्ण सापडले आहेत, त्यामुळे संशयित रुग्ण शोधून त्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवा आणि रुग्ण सापडलेल्या परिसरात योग्य त्या उपाययोजना करा, अशी सूचना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याणमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी महापालिका आयुक्तांना रविवारी दिल्या.
महापालिकेत सावंत हे रविवारी दुपारी साडेचार वाजता आले त्यांनी आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शहरातील आरोग्य व्यवस्था आणि टीबी या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा घेतला. यावेळी आमदार भीमराव तापकीर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव, डॉ. कल्पना बळीवंत, डॉ. प्रल्हाद पाटील आदी उपस्थित होते.
गोवर आजाराची वाढती रुग्णसंख्या पाहता तो आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी उपाययोजना सुचविल्या. सुदैवाने पुण्यात त्याचा प्रादुर्भाव नाही, परंतु तो उद्भवू नये यासाठी आधी काळजी घेण्याविषयी सावंत यांनी सूचना केल्या. यामध्ये शहरातील दाट लोकवस्ती मधील घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून गोवर संशयित रुग्ण शोधून त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविणे, विशेष करून खासगी रुग्णालयांना जास्तीत जास्त भेटी देऊन रुग्ण शोध मोहीम तीव्र करणे, नवीन समावेश झालेल्या गावामध्ये विशेष लक्ष देणे, आदी सूचनांचा समावेश आहे.
याशिवाय पुण्यामध्ये जपानी मेंदूज्वराचा आणि झिंका विषाणूची लागण झालेलाही रुग्ण सापडला आहे. त्यासंबंधीही डॉ. सावंत यांनी आढावा घेतला. राज्य सरकारकडूनही काही मदत हवी असल्यास ती देण्याचे आश्वासनही त्यांनी आयुक्तांना दिले.
सहाय्यक आरोग्यप्रमुख “आऊट ऑफ स्टेशन’…
आयुक्त कार्यालयात भेट देणार असल्याचे सावंतांनी दुपारी दोन वाजता सांगितले होते, त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांनी सगळ्या विभागप्रमुखांसह सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या. मात्र, या चर्चेच्या विषयाची माहिती असलेल्या आणि त्या विभागाचे प्रमुख अधिकारी “आऊट ऑफ स्टेशन’ होते, त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी त्या विभागात पूर्वी काम केले होतं, त्यांच्याकडूनच माहिती घेण्यात आली.