राज्यात आरोग्याचा खेळखंडोबा ! आयुष्मान योजनेच्या संलग्न रुग्णालयांचे 270 कोटी थकले

मुंबई : लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या महात्मा फुले, आयुष्मान भारत या दोन्ही योजनांमधील तब्बल २७० कोटींहून अधिक रक्कम १ एप्रिल २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये संबंधित रुग्णालयांना अदा केली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सरकारकडे पैसा थकित असल्याने संबंधित रुग्णालयांकडून रुग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे आरटीआयच्या माहितीमध्ये निदर्शनास आले आहे.
कोल्हापूर शिवसेना ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख सुनील मोदी यांनी १ एप्रिल २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेत राज्यातील संलग्न रुग्णालयांची सरकारकडे किती रक्कम थकित आहे याची माहिती घेण्यासाठी आरटीआय दाखल केला होता. यामध्ये लाडक्या बहिणीच्या व्यापात आरोग्याचा खेळखंडोबा झाल्याचे दिसून आले आहे.
दोन्ही योजनांमधील तब्बल २७० कोटींहून अधिक रक्कम या कालावधीमध्ये संबंधित रुग्णालयांना अदा केली नसल्याचे समोर आले आहे. मोठ्या प्रमाणावर सरकारकडे पैसा थकित असल्याने संबंधित रुग्णालयांकडून रुग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत असल्याचे सुनील मोदी यांनी निवेदनात म्हटले आहे.
राज्यातील खासगी रुग्णालयात रुग्णांची होणारी लूट दूरच राहिली, पण धर्मादाय रुग्णालये सुद्धा सरकारच्या जमिनी काडीमात्र किमतीत घेऊन आणि टॅक्स सुद्धा न भरता सेवा देण्याच्या नावाने किती बोंबाबोंब करत आहेत. हे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या कारभारावरून समोर आले आहे. दरम्यान, १ एप्रिल २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये सरकारकडून संलग्न रुग्णालयांना महात्मा फुले जनआरोग्य योजनांतर्गत २२०,२४,६५,६५५ कोटी थकित आहेत. दुसरीकडे, पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य योजना अंतर्गत ३७,२९,९०,६५० कोटी रुपये थकित आहेत.





