पिंपरी | गुरुकुलातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

तळेगाव स्टेशन, (वार्ताहर) – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स, स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे यांच्या माध्यमातून गुरुकुल वसतिगृहामध्ये विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबिर आयोजति केले होते. आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना, अशा आरोग्य शिबिरांची नितांत आवश्यकता आहे.
विद्यार्थ्यांना प्रथमोपचार व आरोग्यविषयक सवयी लावणे काळाची गरज आहे. आजचे विद्यार्थी देशाचे उद्याचे उज्वल भविष्य असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ तळेगाव चॅलेंजर्सच्या संस्थापक अध्यक्षा ज्योती राजिवडे यांनी अध्यक्षीय भाषणात, क्लब समाजातील गोरगरीब घटकांसाठी समाज उपयोगी उपक्रम सतत राबवणार असल्याची ग्वाही दिली.
स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुलाची स्थापना ९ वर्षांपूर्वी झाली असून ४५ विद्यार्थी गुरुकुलात राहतात. त्यांची राहण्याची, भोजनाची मोफत व्यवस्था गुरुकुलमार्फत केली जाते. समाजातील दानशूर व्यक्ती गुरुकुलास मदत करतात, असे संस्थापक सुरेश दाभाडे यांनी सांगितले.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य सेविका यांनी गुरुकुलातील ४५ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक असणाऱ्या औषधांचे मोफत वाटप केले. सर्दी, खोकला, ताप आणि पावसाळ्यात येणाऱ्या आजारांची तपासणी करून त्यावरील औषधे देण्यात आली. तसेच आरोग्य केंद्राच्या वतीने गुरुकुलास एक प्रथमोपचार पेटी प्रदान करण्यात आली.
रोटरीचे उपाध्यक्ष भगवान शिंदे, सुरेश शेंडे, संजय मेहता, सुरेश धोत्रे, दादा शिरोडकर, सुनील आगळे यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुक्ता गायकवाड यांनी केले.
आभार प्रदीप टेकवडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भरत राजिवडे, संदीप भोसलकर, वासुदेव लखिमले, सचिन दाभाडे, गणेश घाडगे, रवींद्र काळे, रसिकराज गायकवाड, प्रथमेश बनसोडे, मनोज जैन, सुनील बुटिया, वैशाली काळे यांनी विशेष परिश्रम घेतले.





