अलंकापुरी प्रतिष्ठानची आषाढी वारीत “आरोग्यसेवा”

आळंदी – वारकऱ्यांमध्ये विठ्ठलाचे रूप पाहून आळंदी ते पंढरपूर श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यात अलंकापुरी प्रतिष्ठानतर्फे दररोज वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यात आली. यासेवेचे यंदाचे तपपूर्ती (12 वे ) वर्ष होते.
दुसऱ्याला सुख देण्याने स्वतःला सुख मिळते. दुसऱ्याचे दुःख पुसायला शिकले पाहिजे. यामध्ये सेवा हा भाव असायला हवा. जेथे सेवा आहे तेथे प्रेम आहे. जिव्हाळा आहे. आपुलकी आहे. या भावनेतून अलंकापुरी प्रतिष्ठान गेली 12 वर्ष वारीत वारकऱ्यांना आरोग्य सेवा देत आहे.
अलंकापुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण येळवंडे, डॉ. पी. एस. चौधरी (DHMS), बालाजी कांजळकर, अक्षय तिडके, निलेश विर, ऍड. राम देशपांडे यांचा या सेवेत सक्रिय सहभाग असून आळंदी ग्रामीण रुग्णालय, औंध हॉस्पिटल, सेवाभावी संस्था यांच्याकडून औषधांचे सहकार्य लाभते.
वारी काळात हजारो वारकऱ्यांना तपासणी करून औषधं दिली जातात. यामध्ये प्रामुख्याने वेदनानाशक, सर्दी, खोकला, ताप, जुलाब, अंगदुखी, डोकेदुखी यावरील औषधी उपचार यांचा समावेश असतो. पालखी तळ, विसावा ठिकाणी अलंकापुरी प्रतिष्ठानची रुग्णवाहीका वारकऱ्यांना औषधी उपचारासाठी उपलब्ध असते.





