यंदापासून वारकऱ्यांची आरोग्यसेवा; हॉस्पिटलचे 10 टक्के बेड राखीव

पुणे – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकराम महाराज पालखी सोहळा कालावधीत पुणे जिल्ह्यातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये वारकऱ्यांवर उपचारासाठी 10 टक्के बेड खाटा राखीव ठेवल्या जाणार आहेत. पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना आजार, अथवा अपघात झाल्यास तातडीची वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बजावले आहेत. हे आदेश पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना बंधनकारक असणार आहेत. आषाढी पालखी सोहळा देहू, आळंदी ते पंढरपूर असा दि. 10 जून 2023 ते 13 जुलै 2023 या कालावधीत असणार आहे. त्यात, संत तुकाराम महाराज पालखी 10 जूनपासून सुरू होणार असून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 11 जूनपासून सुरू होणार आहे.
सोहळ्यासोबत सुमारे 5 ते 6 लाख वारकरी पुणे जिल्ह्यातील पालखी मार्गांवरून सहभागी होतात. हा सोहळा देहू, आळंदीपासून हवेली, पुरंदर, बारामती तसेच इंदापूर तालुक्यांतून पुढे सातारा तसेच सोलापूर जिल्ह्यांच्या हद्दीतून पंढरपूरकडे रवाना होतो. जिल्ह्यातील वारीसोबत वैद्यकीय सेवा उपलब्ध असली, तरी अनेकदा वारकऱ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते.
अथवा अपघात घडल्यास उपचार करावे लागतात. अशा वेळी बेड नसल्याचे अथवा उपचाराचे पैसे कोण देणार? याचे कारण पुढे करत वारकऱ्यांना उपचार नाकारले जातात. ही बाब लक्षात घेऊन असे प्रकार टाळण्यासाठी यंदा पुणे जिल्ह्यातील वारी मार्गावरील सर्व शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये 10 टक्के बेड राखीव ठेवले जाणार आहेत. तसेच वारकऱ्यांवर उपचार करणे बंधनकारक असणार आहे. याची जबाबदारी आरोग्य उपसंचालक, मनपा आयुक्त, जिल्हा परिषद सीईओ, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे असेल.
ससूनमध्ये आता समन्वय अधिकारी
वारी काळात ससून रुग्णालयात विशेष समन्वय अधिकारी नेमण्यात येणार आहे. वारीदरम्यान, काही वेळा अपघात, आजारपण अथवा इतर कारणांमुळे वारकऱ्याचा मृत्यू होतो. अशा वेळी शववाहिकेद्वारे संबंधित वारकऱ्याचा मृतदेह ससून रुग्णालयात आणला जातो. अनेकदा येथे कोणीही अधिकारी उपलब्ध होत नाही. त्यामुळे वारकऱ्यांच्या नातेवाईकांची अथवा सोबत असलेल्या सह वारकऱ्यांची गैरसोय होते. त्यामुळे यावर्षी ससूनमध्ये वारी काळासाठी स्वतंत्र समन्वय अधिकारी नेमण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.





