Health Alerts – शाकाहरी जेवण करणाऱ्यांमध्ये हॉटेलमध्ये जेवणासाठी पनीर हा आवडीचा पदार्थ असतो. मात्र, बाजारामध्ये आता नकली पनीरने डोके वर काढले असून त्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जेवण करत असाल तर पनीरची तपासणी करणे आवश्यक आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि फास्ट फूड सेंटरमध्ये ग्राहकांना पनीर किंवा चीजच्या नावाखाली ॲनालॉग (दूधविरहित बनावट घटक) देऊन फसवणूक सुरू असल्याचे समोर आले आहे. पनीरच्या नावाखाली स्वस्त आणि बनावट पर्याय विकणे ही ग्राहकांची कायदेशीर फसवणूक असल्याचे स्पष्ट करत प्रशासनाने देखील यावर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. आता कोणत्याही हॉटेल किंवा रेस्टॉरंटचालकाला चीज किंवा पनीर ॲनालॉगचा वापर करायचा असल्यास, तसा स्पष्ट उल्लेख मेन्यूकार्ड आणि विक्री बिलावर करणे बंधनकारक आहे. तसेच, हॉटेल व्यावसायिकांनी या घटकांच्या खरेदीची मूळ बिले जतन करून ठेवणे आवश्यक आहे. अन्न व औषध प्रशासन. नकली पनीरचे होणार दुष्परिणाम -हृदयरोग : यात मोठ्या प्रमाणावर ट्रान्स फॅट्स आणि पाम ऑईलचा वापर होतो. यामुळे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल वाढते आणि भविष्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. -लठ्ठपणा : यातील हायड्रोजनेटेड फॅट्स आणि स्टार्चमुळे वजन झपाट्याने वाढते. -पचनाचे विकार – हे पदार्थ पचायला जड असतात. यामुळे अपचन, गॅस, एसिडिटी -यकृतावर ताण : यातील रसायने आणि प्रिझर्व्हेटिव्हजवर प्रक्रिया केली असल्याने यकृतावर अतिरिक्त ताण येतो. -मधुमेह : वारंवार अशा पदार्थांचे सेवन केल्याने शरीरातील इन्सुलिनच्या कार्यावर परिणाम होऊन मधुमेहाचा धोका संभवतो. कसे ओळखावे ? – पाण्यात उकळणे : पनीर घरी आणले असेल तर ते पाण्यात उकळून पहा. जर ते खूप जास्त रबरासारखे ताणले जात असेल, तर ते ॲनालॉग असू शकते. – चव : खरे पनीर तोंडात टाकल्यावर विरघळते, तर ॲनालॉग पनीर रबरासारखे लागते. – आयोडीन टेस्ट : पनीरच्या तुकड्यावर आयोडीनचे काही थेंब टाकल्यास तो भाग निळा झाला, तर त्यात स्टार्चची भेसळ आहे असे समजावे. ॲनालॉग म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचे तर, ॲनालॉग म्हणजे हुबेहूब दिसणारा कृत्रिम पदार्थ. खरे पनीर हे शुद्ध दुधापासून बनवले जाते. यात दुधातील फॅट्स आणि प्रथिने असतात. ॲनालॉग पनीर/चीज बनवण्यासाठी दुधाचा वापर अत्यल्प किंवा अजिबात केला जात नाही. त्याऐवजी वनस्पती तेल, पाम ऑईल, स्टार्च, मिल्क पावडर आणि काही विशिष्ट रसायनांचे मिश्रण करून ते तयार केले जाते.