मुख्याध्यापिकेला लाच घेताना पकडले श्रीरामपूर येथे लाचलुचपतची कारवाई

श्रीरामपूर – वरिष्ठ वेतन श्रेणी फरकाच्या बिलाचे काम करून देण्यासाठी केलेल्या मदतीच्या मोबदल्यात ४५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने शहरालगतच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेला रंगेहात पकडले.
शहरातील बोरावके महाविद्यालयाजवळील सुभद्राबाई बाबुराव गायकवाड प्राथमिक शाळेच्या एका शिक्षिकेची सन २०१५ ते २०२२ या कालावधीतील वरिष्ठ वेतन श्रेणीच्या फरकाची रक्कम १ लाख ६५ हजार रुपये खात्यामध्ये जमा झाली होती. वरिष्ठ वेतन श्रेणीचे फरकाच्या बिलाचे काम करून देण्यासाठी मदत केली. त्या मोबदल्यात शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता नंदलाल पवार (वय ५३) यांनी संबंधित शिक्षकेच्या पतीला ५० हजार रुपये मागितले.
तडजोडीअंती ४५ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार बुधवारी (ता.१२) दुपारी दोन वाजेच्या सुमारास नगर येथील लाचलुचपत विभागाने सापळा रचून शंकरराव गायकवाड ग्रामीण एज्युकेशन संस्था, श्रीरामपूर संचलित सुभद्रा मुलींचे वसतिगृहाच्या अधीक्षक कार्यालयात ४५ हजार रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापिका संगीता पवार यांना रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे उपाधीक्षक प्रवीण लोखंडे, निरीक्षक डॉ.शरद गोर्डे, हवालदार हारुण शेख, बाबासाहेब कराड, किशोर लाड, महिला पोलीस हवालदार संगीता शिंदे यांनी केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





