वाहनधारक व ग्रामस्थांतून संताप
चाफळ : चाफळ, ता. पाटण विभागातील खोनोली ते कोचरेवाडी दरम्यान असणाऱ्या घाटरस्त्याची ठिकठिकाणी चाळण झाली आहे. अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेक वाहन धारकांना जायबंदी होण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे वाहन धारकांतून संताप व्यक्त होत आहे. गतवर्षी सर्वदूर झालेल्या अतिवृष्टीमुळे चाफळ विभागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. डांबरीकरण उखडल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. डोंगर दऱ्यातील पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या लगत खोदण्या आलेले नाले गाळाने मुजले आहेत.
त्यामुळे डोंगरदऱ्यातून येणारे गाळमिश्रीत पाणी थेट रस्त्यावर येऊन चाफळ विभागातील जवळपास सर्वच रस्त्यांचे डांबरीकरण उखडून गेले आहे. त्यामध्ये खोनोली-कोचरेवाडी दरम्यान असणाऱ्या घाटरस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने वाहनधारक तसेच स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
वाहनधारकांसह या रस्त्यावरून नियमित ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांकडून भविष्यातील रस्त्याची अडचण लक्षात घेता बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी नाले साफसफाई तसेच रस्ते दुरूस्तीचे मागणी होते आहे.