पुणे : १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातून उघडकीस आली आहे. अमरसिंह गचांड (१७) असे खून झालेल्या मुलाचे नाव असून, आरोपींनी इंस्टाग्रामवर एका मुलीच्या माध्यमातून ओळख करून त्याला जाळ्यात ओढल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. चार महिन्यापूर्वी अमरसिंह गचांड याने एका व्यक्तीच्या खुनाचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर अमरसिंह आणि आरोपींमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. प्राथमिक माहितीनुसार, याच वादातून त्याचा काटा काढण्याचा कट रचण्यात आला. २९ डिसेंबर रोजी अमरसिंह सकाळी घरातून बाहेर पडला. त्यानंतर आरोपींनी एका मुलीच्या माध्यमातून त्याला कात्रज परिसरात बोलावून घेतले. तेथून त्याला खेडशिवापूर परिसरात नेण्यात आले, जिथे आरोपींनी दगड आणि कोयत्याने वार करून त्याचा निर्घृण खून केला. खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने पाणी अडवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चारीत मृतदेह पुरून टाकण्यात आला. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दरम्यान, अमरसिंह घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्याचा मोबाईल फोन बंद येत होता, तसेच त्याची दुचाकी (TVS Access) देखील कुठे आढळून आली नाही. २४ तासांनंतर कुटुंबीयांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासात त्याचे शेवटचे लोकेशन लोणावळा परिसरात असल्याचे समोर आले. कुटुंबीयांनी संशयितांची नावे व मोबाईल क्रमांक पोलिसांना दिले असून, संबंधित संशयितांचे फोन बंद असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र तरीही संशयितांना तातडीने चौकशीसाठी बोलावले नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणाचा गंभीर आणि सखोल तपास करावा, अशी मागणी त्यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे. या घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना ट्रॅप करून गंभीर गुन्हे घडत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.