रांजणगाव गणपती (पुणे) – येथे रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत व सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर यांच्या पुढाकाराने एका 82 वर्षीय मृत व्यक्तीवर त्याच्या दोन मुली, दोन सुना व एका नातीनी अत्यंसंस्कार केले आहेत.
रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील देवाचीवाडी येथे राहणाऱ्या नामदेव सखाराम खेडकर (वय 82) यांचे मंगळवारी (दि. 8) सकाळी 10 वाजता गावातील खासगी दवाखान्यात हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. परंतू देवाचीवाडी येथे काही दिवसांपूर्वीच करोनाने 2 व्यक्तींचा मृत्यू झाला होता. नामदेव खेडकर यांचाही मृत्यू करोनानेच झाला असावा, त्यामुळे भावकीतील तर सोडाच पण गावातील एक पुढारी सुद्धा खेडकर कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी पुढे आला नाही.
नामदेव खेडकर यांचा मृतदेह 5 ते 6 तास दवाखान्यात तसाच पडून होता. 2 सुना, 2 मुली आणि नात यांना काय करावं काहीच सुचत नव्हतं. शेवटी डॉक्टरांनी रांजणगावचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना फोन करुन ही हकीकत सांगितली. पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी खेडकर यांची नात किरण पिंगळे हिच्याशी संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर प्रथम डॉक्टारांना मयत नामदेव खेडकर यांची करोना चाचणी करायला सांगितली. त्यानंतर डॉक्टरांनी मयताचा करोना अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे सांगितले. सुरेशकुमार राऊत यांनी 1 पोलीस आणि 2 कर्मचारी खेडकर कुटुंबाच्या मदतीला पाठवले.
खेडकर यांच्या दोन्ही मुलांचा 10 ते 12 वर्षापूर्वी दुर्दैवी अपघाताने मृत्यू झाला आहे. तसेच एका जावयाचाही 16 वर्षापूर्वी अपघाताने मृत्यू झाला. त्यामुळे घरात कोणीच कर्ता पुरुष नाही. नातवंडे लहान, दोन सुना, दोन लेकी आणि एक नात…भावकी आणि गावकीतला एकही माणूस दवाखान्यात फिरकेना… अश्या वेळेस आता आपल्या वडिलांचा अंत्यविधी कसा होणार असा लेकींना प्रश्न पडला…? तर आपल्या सासऱ्यांनी आयुष्यभर कष्ट करुन संसार फुलवला पण त्यांच्या अंत्यविधीला खांदा देण्यासाठी भावकीतील 4 जण सुद्धा पुढे येत नसल्याने सुनांचा नाईलाज झाला.
निर्णय घेतला अन् अंत्यविधी गावातच केला –
काही जवळचे नातेवाईक आले पण कोरोनाच्या संशयापायी सल्ला देऊ लागले. परंतू नातीने (मुलीची मुलगी) निर्णय घेतला. काहीही झालं तरी आजोबांचा अंत्यविधी हा त्यांच्या गावातच करायचा. पण अडचण एक होती की आजोबांचा करोना अहवाल कळणार कसा…? त्यावेळेस रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत हे अगदी देवदूत बनून धावून आले त्यांनी एक पोलीस आणि दोन कर्मचारी त्या कुटुंबाच्या मदतीला पाठवले. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर यांच्या सहकार्यामुळे 2 मुली, 2 सुना आणि नात यांनी खेडकर यांचा अंत्यविधी करत सामाज्यात एक वेगळा पायंडा पाडला.
सध्या शिरुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात करोनाचे रुग्ण सापडत आहेत. नामदेव खेडकर यांचा मृत्यू हृद्यविकाराने झालेला असतानाही केवळ त्यांचा मृत्यू करोनाने तर झाला नाही ना…? असा संशय भावकीला तसेच गावकऱ्यांना आल्याने मदत करायला कोणीही तयार नव्हते. त्यामुळे त्या कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. रांजणगाव गणपती येथे डझनभर पुढारी असताना सारा गाव मामाचा आणि एक पण नाय कामाचा असाच काहीसा अनुभव आम्हाला आला.
– किरण पिंगळे, नात