मुलावर मणक्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी
पुणे – लहान वयातच मणक्याच्या आजाराने त्रस्त मुलाला नियमित कामे करताना अनेक अडचणी येत होत्या. “आपल्या वयाची मुले खेळतात, परंतु मला खेळता येत नाही’, या विचाराने मुलामध्ये न्युनगंड आला. शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांनी लाखो रुपये खर्च सांगितला. स्पाईन सर्जन व ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले आणि गोकुळदास तेजपाल शासकीय रुग्णालयातील स्पाईन सर्जन डॉ. धीरज सोनावणे यांच्या टीमने मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यामुळे मुलाला वेदनाविरहीत जीवन जगता येणार आहे.
कर्नाटकातील बेल्लूर गावात बिगारी काम करणाऱ्या कुटुंबातील एक शाळकरी मुलगा रमेश (नाव बदलेले आहे) हा मणक्याच्या आजाराने त्रस्त होता. रमेशच्या आई-वडिलांनी त्याच्या उपचाराकरिता बऱ्याच डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले. परंतु, शस्त्रक्रियेसाठी लाखो रुपये खर्च असल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी आई-वडिलांनी उपचारकरिता त्याला मुंबई येथील गोकुळदास तेजपाल शासकीय रुग्णालयातील मणक्याचे सर्जन व स्पाईन सर्जन डॉ. सोनावणे यांना दाखविले. त्यांनी संपूर्ण तपासणी केल्यावर स्पाईन सर्जन व सहसंचालक डॉ. चंदनवाले यांच्याशी चर्चा करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. एवढच नव्हे तर शस्त्रक्रियेचा खर्चही विविध संस्थांमार्फत करू, असे आश्वासन दिल्यावर पालकांना धीर मिळाला.
डॉ. चंदनवाले, डॉ. सोनावणे यांनी अत्याधुनिक उपकरणे व साधनसामुग्रीचा वापर करून ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली. या शस्त्रक्रियेदरम्यान डॉ. नितीन महाजन, डॉ. अजयबीर सिंग, डॉ. ओंकार शिंदे, डॉ. गौरव वाघमारे, डॉ. नवेद अन्सारी तसेच अधिपरिचारिका रंजन काटे, श्रेया जासंदेकर व रंजन खटाळ यांनी सहकार्य केले. रुग्णाने शस्त्रक्रियेला उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे दुसऱ्याच दिवशी तो स्वतःच्या पायावर उभा राहून व्यवस्थीतरित्या चालू लागला.