HDFC Bank : ‘एचडीएफसी’ बँकेतील गोपनीय माहिती लीक? दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी सुरू
HDFC Bank : HDFC बँकेतील गोपनीय माहिती बाहेर गेल्याच्या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू आहे. दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले असून माहितीच्या गैरवापराचीही तपासणी होत आहे.

HDFC Bank : एचडीएफसी बँकेतील गोपनीय माहिती लिक झाल्याच्या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू आहे. या चौकशीत बँकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यवसायाची गोपनीय रणनीती आणि बाजारावर परिणाम करू शकणारी संवेदनशील माहिती बाहेरील व्यक्तींना दिल्याचे पुरावे मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीचा गैरवापर झाला का, याचीही बँक तपासणी करत आहे.
बँकेने अंतर्गत चौकशी सुरू असल्याचे मान्य केले आहे. मात्र, चौकशीतील निष्कर्ष किंवा संबंधित अधिकाऱ्यांबाबत बँकेने अधिक माहिती दिलेली नाही. या प्रकरणाची माहिती याच वर्षाच्या सुरुवातीला बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाला आणि संचालक मंडळातील काही सदस्यांना देण्यात आल्याचे सांगितले जाते. संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांना चौकशीच्या निष्कर्षांची औपचारिक माहिती देण्यात आली आहे.
बँकेच्या धोरणानुसार सर्व संबंधित पुरावे गोळा करून त्यांचा आढावा घेतला जात असल्याचे प्रवक्त्याने सांगितले. चौकशी पूर्ण झाल्यानंतर निष्कर्षांच्या आधारे योग्य कारवाई केली जाईल, असे बँकेने स्पष्ट केले आहे.
हा प्रकार बँकेत नेतृत्वबदलाच्या काळात समोर आला आहे. ICICI समूहात दीर्घकाळ काम केलेले अनुप बागची 27 ऑक्टोबरपासून HDFC बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहेत. बँकेच्या शेअरमध्ये यंदा सुमारे 28 टक्क्यांची घसरण झाली आहे.
यापूर्वी मार्चमध्ये तत्कालीन अध्यक्ष अतनु चक्रवर्ती यांनी राजीनामा दिला होता. विद्यमान CEO शशिधर जगदीशन यांनीही पुढील कार्यकाळ न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच उपव्यवस्थापकीय संचालक कैजाद भरूचा यांनीही डिसेंबरअखेर पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे नेतृत्वबदलाच्या पार्श्वभूमीवर ही अंतर्गत चौकशी बँकेसाठी महत्त्वाची ठरली आहे.





