वॉशिंग्टन – भारताने अलिकडेच मिशन शक्ती या उपग्रह विरोधी क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. त्यातून भारताने अंतरीक्षाच्या कक्षेतील जो उपग्रह नष्ट केला त्याचे सुमारे चार हजार तुकडे आता अंतराळात फिरत असून त्या कचऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या अंतराळवीरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भारताची ही कृती अत्यंत घातक ठरली आहे असे अमेरिकेच्या नासा या अंतरीक्ष संशोधन संस्थेने म्हटले आहे. नासाचे एक तंत्रज्ञ जीम बिडेनस्टाईन यांनी ही बाब निदर्शनाला आणली आहे.
त्यांनी सांगितले की आता आम्ही हे तुकडे शोधायच्या कामी लागलो आहोत. पण जे कमी आकाराचे तुकडे आहेत ते शोधणे अशक्य आहे. आम्ही आत्ता पर्यंत साठ मोठे तुकडे शोधले आहेत. भारताने तीनशे किमी अंतरावरील कक्षेत असलेला उपग्रह नष्ट केला आहे त्या कक्षेतच हे तुकडे फिरत आहेत. यातील 24 तुकडे अंतराळातील आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन जवळ आढळून आले. हे अत्यंत घातक असून त्यामुळे स्पेस स्टेशनला आणि त्यातील अंतराळवीरांनाच धोका निर्माण झाला आहे.
मानवासहित अंतराळ यान पाठवण्यासाठी यामुळे भविष्यात काही अडचणी उद्भवू शकतात असे त्यांचे म्हणणे आहे. भारताची अशा प्रकारची कृती पुर्णपणे अयोग्य असल्याची टिपण्णीही त्यांनी केली आहे. नासाला याची गंभीर दखल घ्यावी लागेल अशी सुचनाही त्यांनी केली आहे. चीननेही सन 2007 साली अशीच कृती करीत एक उपग्रह नष्ट केला होता त्याचेही तीन हजार तुकडे तेथे कार्यरत आहेत. अंतरीक्षातील कचरा आता वाढत चालला असून असे एकूण 10 हजार तुकडे स्पेस स्टेशनसाठी अडचणीचे ठरत आहेत असे त्यांचे म्हणणे आहे.