अण्णापूरमध्ये घातक कचरा जाळला! प्रशासनाची उदासीनता, नागरिकांच्या जीवाला धोका

शिरूर- शिरूर तालुक्यातील अण्णापूर गावात २२ एप्रिलच्या रात्री बेकायदेशीररित्या प्लास्टिक व रबरसदृश्य घातक कचरा जाळल्याने विषारी धूर पसरला. यामुळे पर्यावरणाची मोठी हानी झाली, तर लहान मुले, वृद्ध आणि आजारी नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला. गावात भीतीचे वातावरण आहे.
सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी व्हिडिओ पुराव्यासह पोलीस उपविभागीय अधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला माहिती दिली, पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर डायल ११२ च्या मदतीने टाकळी हाजी पोलिसांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आग विझवली.
घटनास्थळी औद्योगिक कचरा आढळला असून, स्थानिक कंपन्यांवर संशय आहे. वाळुंज यांनी प्रशासनाच्या उदासीनतेवर टीका करत लवकरच वरिष्ठ कार्यालयात तक्रार करण्याचे जाहीर केले. ग्रामपंचायतीनेही पोलिसांत निवेदन देण्याचे ठरवले. नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.



