पाटण तालुक्यात पावसाचा कहर; धरणातून पाणी सोडल्याने कोयना नदीला पूर

पाटण – पाटण तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा कहर सुरू आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी पायथा वीजगृहातून 1050 क्युसेक पाण्याच्या विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कोयना नदीला पूर आला आहे. मुळगाव येथील पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास येत्या 72 तासांत कोयना धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागेल, असे धरण व्यवस्थापनाने सांगितले.
पाटण तालुक्याला यंदाही पावसाचा तडाखा बसला असला, तरी सुदैवाने अद्याप कुठेही जीवितहानी झालेली नाही. पावसाचा जोर कमी होत नसल्याने तालुक्यातील डोंगराळ भागातील गावे गारठली आहेत. कोयना धरणातून पाणी सोडायला सुरुवात झाल्याने कोयना नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणातून आणखी पाणी सोडावे लागले, तर नदीकाठच्या गावांमधील लोकांचे स्थलांतर तात्पुरत्या निवारा शेडमध्ये करावे लागणार आहे.
त्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, पूररेषेतील गावांची यादी तयार करण्यात आली आहे. धरणाचे दरवाजे उचलून पाणी सोडल्यास किती लोकांना सुरक्षितस्थळी हलवावे लागेल, कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याची तयारी सुरू करण्यात आली आहे. पाटण तालुक्यातील कोयना धरणापासून कराडपर्यंत नदीकाठाची गावे पूररेषेत येतात. त्यामध्ये मारुल, शिरळ, येराड, पाटण, रामापूर, मुळगाव, त्रिपुदी, सांगवड, नावडी आदी गावांचा समावेश आहे.





