मुंबई : विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची (FIIs) सातत्याने होणारी जोरदार विक्री आणि अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाने गाठलेला विक्रमी नीचांकी स्तर यामुळे मंगळवारी (१६ डिसेंबर २०२५) भारतीय शेअर बाजारात नकारात्मक वातावरण राहिले. जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांचाही परिणाम होऊन प्रमुख निर्देशांक मोठ्या घसरणीसह बंद झाले. डॉलरसमोर रुपयाची किंमत प्रथमच ९१ च्या पातळीवर पोहोचल्याने गुंतवणूकदारांचे सेंटिमेंट नकारात्मक झाले. दिवसभर झालेल्या चौफेर विक्रीमुळे बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) ५३३.५० अंक म्हणजेच ०.६३ टक्के इतका कोसळून ८४,६७९ अंकांवर स्थिरावला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने ८४,६२० अंकांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) निफ्टी-५० (Nifty-50) निर्देशांक १६७.२० अंकांनी किंवा ०.६४ टक्के घसरून २५,८६० वर बंद झाला. निफ्टीने व्यवहारात २५,८३४ अंकांची नीचांकी पातळी गाठली होती. बाजारातील घसरण सर्वसमावेशक राहिली. आर्थिक (Financial), धातू (Metal), माहिती तंत्रज्ञान (IT) आणि स्थावर मालमत्ता (Realty) क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक विक्रीचा दबाव दिसला. सर्वाधिक घसरण, निफ्टी रियल्टी आणि निफ्टी प्रायव्हेट बँक (१% पेक्षा जास्त), पीएसयू बँक (०.८९%) आणि निफ्टी आयटी (०.८४%) झाली. केवळ निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल्स आणि निफ्टी मीडिया हेच क्षेत्र हिरव्या निशाणीवर बंद झाले. टॉप लूजर्स आणि गेनर्स – सेन्सेक्समधील प्रमुख शेअर्समध्ये अॅक्सिस बँक आणि इटरनल या कंपन्यांना सर्वाधिक फटका बसला. त्यांच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. याव्यतिरिक्त, एचसीएल टेक्नोलॉजीज, टाटा स्टील, बजाज फिनसर्व, अल्ट्राटेक सिमेंट्स, बजाज फायनान्स आणि एनटीपीसी यांचे शेअर्सही १ टक्क्यांहून अधिक घसरले. या घसरणीतही टायटन आणि भारती एअरटेल यांचे शेअर्स १ टक्क्यांहून अधिक वाढले. महिंद्रा अँड महिंद्रा (M&M), एशियन पेंट्स आणि ट्रेंट हे शेअर्सही वाढीसह बंद झाले. ब्रॉडर मार्केटमध्येही निराशा दिसून आली. निफ्टी मिडकॅप १०० ०.८३ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.९२ टक्के इतका कोसळला. रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर – कमकुवत जागतिक संकेत आणि FIIs च्या सततच्या विक्रीमुळे रुपयाने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली. मंगळवारी इंट्रा-डे व्यवहारात रुपया ३६ पैशांनी घसरून प्रथमच ९१ चा स्तर ओलांडला आणि डॉलरच्या तुलनेत ९१.१४ वर ट्रेड करत होता. भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत (India-US Trade Deal) स्पष्टतेचा अभाव असल्याने रुपयावर दबाव वाढला आहे. गेल्या १० ट्रेडिंग सत्रांमध्ये रुपया ९० वरून ९१ प्रति डॉलरपर्यंत घसरला आहे. तथापि, डॉलरमधील कमकुवतपणा आणि आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट यामुळे रुपयाची पुढील घसरण काही प्रमाणात रोखली गेली, असे चलन व्यवहार तज्ञांनी सांगितले. जागतिक बाजारातील स्थिती – एशियाई शेअर बाजारात मंगळवारी घसरण दिसून आली. अमेरिकेतील आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) संबंधित शेअर्समधून गुंतवणूकदार सातत्याने पैसे काढत असल्याने वॉल स्ट्रीटमध्येही घसरण झाली होती. याचा थेट परिणाम आशियाई बाजारांवर झाला. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक १.२७ टक्के, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.७५ टक्क्यांनी कोसळला. अमेरिकेतील वॉल स्ट्रीटचे प्रमुख निर्देशांक सोमवारी घसरणीसह बंद झाले. फेडरल रिझर्व्हच्या संभाव्य धोरणात्मक निर्णयांचे संकेत शोधत गुंतवणूकदार आर्थिक डेटावर लक्ष ठेवून आहेत. बाजार विश्लेषक विनोद नायर यांच्या मते, सातत्याने होणारी FIIs ची विक्री आणि जागतिक कमकुवतपणामुळे रुपया नवीन नीचांकी पातळीवर घसरला, ज्यामुळे देशांतर्गत शेअर बाजारात घसरण झाली. चलन अस्थिरता आणि विदेशी गुंतवणुकीतील अनिश्चिततेमुळे बाजारात अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, कमोडिटीच्या किमतींमधील नरमाई आणि कंपन्यांच्या कमाईच्या चांगल्या अंदाजामुळे मध्यम अवधीसाठी बाजाराला आधार मिळू शकतो. गुंतवणूकदारांचे ४ लाख कोटींचे नुकसान – आजच्या ट्रेडिंग सत्रात सर्वच क्षेत्रांमध्ये आलेल्या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना जवळपास ४ लाख कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर सूचीबद्ध असलेल्या सर्व कंपन्यांचे बाजार भांडवल (Market Capitalization) ४७१ कोटी रुपयांवरून कमी होऊन ४६७ कोटी रुपये झाले.