Haveli Taluka – हवेली तालुक्यात नेतृत्वाचा प्रश्न नाही, तर सर्वसमावेशक नेतृत्वाला रोखून धरणाऱ्या राजकीय संस्कृतीचा आहे. त्या राजकीय संस्कृतीला तालुक्यातुनच मदत होणा-या पद्धतीचा आहे. पुणे व पिंपरी चिंचवड या दोन शहरांच्या सावलीत वाढलेला हा तालुका आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असला तरी राजकीय, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या दिशाहीन आहे. जर आताच तालुक्याने एकत्रितपणे विचार केला नाही, तर पुढील पिढीला फक्त जमिनीचा उंच दर आणि इमारतींची उंची मिळेल. परंतु संस्थात्मक बळकटी आणि स्वायत्त राजकीय ओळख हवेली तालुक्याने गमावलेली असेल. तालुक्याच्या दृष्टीने रात्र नाही आता तर दिवसही वै-याचा आहे. त्यामुळे झोपेचे सोंग घेऊ नका, हवेलीकरांनो जागे व्हा. हवेली तालुक्याच्या राजकीय इतिहासात जर एखाद्या व्यक्तिमत्वाने सर्व स्तरांवर छाप सोडली असेल तर ते म्हणजे अण्णासाहेब मगर. त्यांनी उभी केलेली संस्थात्मक पायाभरणी आजही तालुक्याच्या स्मरणात आहे. परंतु प्रश्न असा आहे की. त्यांच्या नंतर त्या उंचीचे नेतृत्व का घडले नाही ? अण्णासाहेब मगर यांच्या कल्पक नेतृत्वाखाली थेऊरच्या माळरानावर उभा राहिलेला यशवंत सहकारी साखर कारखाना केवळ उद्योग नव्हता; तो ग्रामीण स्वाभिमानाचे प्रतीक होता. आज मात्र तो बंद पडून १५ वर्षे उलटली. कारखान्याच्या भग्न वास्तू सोबतच ग्रामीण स्वाभिमानाचा, राजकारणाचा, अर्थकारणाचा कणा तुटलेला दिसत आहे. यशवंत साखर कारखाना बंद पडल्यानंतर उस गाळप करणाऱ्या गुऱ्हाळांची संख्या वाढली. गुऱ्हाळातील संघटित दरपद्धतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून उस गाळपात स्पर्धेचा अभाव दिसत आहे. हा केवळ आर्थिक प्रश्न नाही; ही ग्रामीण राजकीय नेतृत्वाच्या अपयशाची जाहीर कबुली आहे. हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडात नावाजलेली संस्था आहे. परंतु १५-२० वर्षे निवडणूकच न होणे ही लोकशाही व्यवस्थेची गंभीर विटंबना आहे. सत्ताधाऱ्यांना निवडणूक नको का होती? प्रशासकांच्या माध्यमातून कारभार ठेवणे कोणाच्या हिताचे होते ? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. शाश्वत विकास, अनियंत्रित विस्तार हवेली पंचायत समितीकडे स्वतःची सुसज्ज इमारत नाही. तालुक्याचे स्वतःचे ग्रामीण रुग्णालय नाही. तालुक्याचे स्वतःचे क्रीडासंकुल नाही. तालुक्यातील अशा प्रकारच्या पायाभूत सुविधांबाबत राज्य आणि केंद्र शासनाकडून अपेक्षित गुंतवणूक दिसत नाही. हवेली तालुक्यात आज जो विकास दिसतो तो फक्त जमिनींचे वाढलेले बाजारभाव, खासगी गुंतवणूक व शहरांच्या जवळीकतेचा परिणाम आहे. परंतु हा शाश्वत विकास नाही. तो राजकीय नियोजनाशिवाय झालेला अनियंत्रित विस्तार आहे. पुणे ग्रामीण राजकारण ( संग्रहित छायाचित्र ) कुपमंडूक वृत्ती विकासास हानीकारक हवेली तालुक्यातील स्थानिक माणूस बंडखोर आहे हे खरे आहे. परंतु बंडखोरी आणि संघटित नेतृत्व यामध्ये सूक्ष्म फरक आहे. तो फरकच स्थानिक नेत्यांना कळाला नाही. इथे अनेक नेते तयार झाले, पण तालुक्या पलीकडे उभे राहणारे नेतृत्व तयार झाले नाही. त्याची अनेक कारणे आहेत. स्थानिक पातळीवरील मत्सर, वरिष्ठांची हस्तक्षेपनीती, स्थानिक नेत्यांमध्ये एकमेकांबद्दल असणारी “करेक्ट कार्यक्रम” संस्कृती, स्थानिक नेत्यांनी गावापलीकडे विचार न करणे, स्वतःचा “कन्फर्ट झोन” न सोडणे. कुपमंडूक वृत्ती अशा अनेक कारणांमुळे हवेली तालुक्यातील स्थानिक राजकीय नेते व तालुका सामुहिक विकासाच्या दृष्टीकोनातून मागास आहे. सर्वपक्षीयांनी बदलण्याची गरज भविष्यात हवेलीतील सर्वच पक्षांतील स्थानिक राजकीय नेत्यांनी व मतदारांनीही आमुलाग्र बदलण्याची नितांत गरज आहे. मतदारांनीही मतदान करण्यासाठी पैसे नको, तीर्थक्षेत्र, देवदर्शन नको परंतु निवडून आल्यावर प्रभागाचा, गावाचा, तालुक्याचा शाश्वत विकास करा अशी ठाम भूमिका घेण्याची गरज आहे. समन्वय समितीच्या माध्यमातून अग्निशमन केंद्र, क्रीडासंकुल, ग्रामीण रुग्णालय, यशवंत कारखाना, बाजार समिती, रस्ते, वाहतूक कोंडी, पिण्याचे व शेतीचे पाणी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, आरोग्य सुविधा, आदी प्रश्नांवर एकत्रित आंदोलनाची, सर्वपक्षीय कृती आराखड्याची गरज आहे. अन्यथा हवेली तालुक्यातील पुढील पिढी कदापिही माफ करणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. चार मतदारसंघात तालुका विभागला बाजार समितीचे प्रादेशिकीकरण, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, आता राष्ट्रीयीकरण अशा पुर्नरचनेमागे नेमके धोरण काय आहे, हे कोडे उमगत नाही. मतदारसंघ पुर्नरचनेचा परिणाम होऊन हवेली तालुक्याचा ग्रामीण भाग चार विधानसभा मतदार संघात विभागला आहे. शिरूर-हवेली, पुरंदर-हवेली, हडपसर व खडकवासला विधानसभा मतदारसंघ या चार विधानसभा मतदारसंघात हवेली तालुका विभागला आहे. या विभाजनामुळे हवेली तालुक्याचा एकात्म आवाज हरवला आहे. चार आमदार, पण तालुक्यासाठी एकही पूर्णवेळ जबाबदार नाही. इतर तालुक्यात शक्यतो अशी परिस्थिती नसते. त्यामुळे हवेली तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रश्न दुय्यम ठरले. राजकीय नकाशा ज्या पद्धतीने आखला गेला, त्यात हवेलीचा ग्रामीण भाग कायमच उपेक्षित राहिला.