पुणे : बदलती जीवनशैली, वाढती महागाई आणि करिअरमधील अनिश्चितता यामुळे आजच्या काळात लग्न हे केवळ भावनिक बंधन न राहता ती एक ‘आर्थिक भागीदारी’ देखील बनली आहे. लग्नानंतर पैशांवरून होणारे वाद टाळण्यासाठी आता तरुण पिढी ‘फायनान्शिअल ट्रान्सपरन्सी’ म्हणजेच आर्थिक पारदर्शकतेला अधिक महत्त्व देत असल्याचे चित्र दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, लग्नापूर्वी जोडीदाराशी उत्पन्न, जबाबदाऱ्या, कर्ज आणि भविष्यातील ध्येय यावर मोकळेपणाने चर्चा केल्यास नात्यात विश्वास आणि स्थिरता निर्माण होण्यास मदत होते. लग्नाच्या सुरुवातीलाच स्वतःचे उत्पन्न, ईएमआय (EMI), बचतीची सवय आणि खर्च करण्याच्या पद्धती यावर प्रामाणिकपणे चर्चा करणे आवश्यक आहे. अनेकदा लग्नानंतर आर्थिक बाबी समोर आल्या की जोडीदारांमध्ये तणाव निर्माण होतो. सुरुवातीलाच या गोष्टी स्पष्ट केल्यास भविष्यातील अनेक गैरसमज टळू शकतात. भारतीय संस्कृतीत लग्न हे दोन व्यक्तींपुरते मर्यादित नसते. यात आई-वडील, भावंडे आणि संयुक्त कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांचाही समावेश असतो. आपल्या कुटुंबाची जबाबदारी कशी उचलली जाईल, यावर आधीच चर्चा झाल्यास नंतर जोडीदारावर अचानक बोजा पडत नाही आणि वादही होत नाहीत. अनेकदा पती-पत्नीच्या उत्पन्नात फरक असतो. “जर या उत्पन्नातील फरकाला अहंकार किंवा श्रेष्ठ-कनिष्ठतेशी जोडले, तर नात्यात दुरावा येऊ शकतो,”. त्यामुळे दोघांच्याही आर्थिक योगदानाचा आदर करणे आणि आपापल्या भूमिका समजून घेणे संसाराच्या स्थिरतेसाठी आवश्यक आहे. खर्चाच्या सवयींचा आदर करा प्रत्येकाची पैशांकडे बघण्याची दृष्टी वेगळी असते. कोणी जास्त खर्च करणारे असते, तर कोणाला बचत करण्याची सवय असते. एकमेकांच्या सवयींवरून उणीदुणी काढण्यापेक्षा खर्चाच्या बाबतीत एक सुवर्णमध्य गाठणे गरजेचे आहे. बजेटबाबत एकमेकांचे विचार जाणून घेतल्यास आर्थिक सुरक्षा आणि आनंद दोन्ही मिळू शकतात. भविष्यातील ध्येय आणि गुंतवणूक घर खरेदी, मुलांचे शिक्षण, करिअरमधील बदल किंवा व्यवसायाचे नियोजन हे सर्व आर्थिक बाबींशी जोडलेले असते. जर जोडप्याने मिळून भविष्यातील ध्येय निश्चित केली, तर संसारात चांगला ताळमेळ राहतो आणि मोठे आर्थिक निर्णय घेताना अडचण येत नाही.