जगातील ‘या’ सर्वाधिक झपाटलेल्या जंगलात सगळीकडे दिसतात फक्त लाकडी ‘मृतदेह’!

जगात अशी अनेक विचित्र ठिकाणे आहेत, ज्यांची अनेकदा चर्चा होत असते. तुम्ही स्मशानभूमीत मानवी कबरींच्या वर थडग्यांचे दगड पाहिले असतील, पण तुम्ही कधी झाडांचे मृतदेह पाहिले आहेत का? जगात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे झाडांचे अवशेष पाहून असे वाटते की ते कोणाचे तरी मृत शरीर आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका ठिकाणाविषयी सांगणार आहोत, जिथे सर्वत्र झाडांचे अवशेष अथवा मृतदेह पडलेले आहेत. याला झपाटलेले जंगल या नावाने ओळखले जाते.
हवामान बदलामुळे जगभरात अनेक बदल होत आहेत. उष्णता प्रचंड वाढत आहे आणि हिमनद्या वितळत आहेत. वातावरणातील बदलामुळे अमेरिकेतील अनेक जंगले निर्जन आणि भयावह बनत आहेत. हे विशेषतः नॉर्थ कॅरोलिना आणि मॅसॅच्युसेट्समध्ये घडत आहे. समुद्राची पातळी वाढत आहे, त्यामुळे अनेक शहरे बुडण्याचा धोका आहे. त्यामुळे समुद्रकिनारी वसलेल्या जंगलांचेही स्मशानभूमीत रूपांतर होत आहे.
अहवालानुसार, समुद्राची पातळी तीनपट वेगाने वाढत आहे. त्यामुळे जंगलात खारे पाणी भरत असून झाडं सुकत आहेत. व्हर्जिनिया इन्स्टिट्यूट ऑफ मरीन सायन्सचे इकोलॉजिस्ट मॅथ्यू किरवान म्हणतात की, अशी निष्प्राण जंगले पूर्व किनाऱ्यावर जास्त दिसतात. यंदा त्यात 15 फुटांनी वाढ झाली आहे.
समुद्राचे खारे पाणी आणि मीठ जंगलात गेल्याने झाडे सुकत असल्याचे त्यांनी सांगितले. झाडे सुकल्यानंतर त्यांचा वरचा भाग स्मशानभूमीत थडगे असल्याप्रमाणे दिसतात.
पर्यावरणशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की लोक फक्त शहरे आणि जमीन बुडवण्याचा विचार करतात. जंगले नष्ट होत असल्याची कोणाला पर्वा नाही. सध्या हजारो एकर जंगले नष्ट होत असून यावर उपाय नाही. याशिवाय वादळ आणि त्सुनामीमुळे खारे पाणी जंगलात शिरते, त्यामुळे हिरवीगार झाडे करडी आणि निष्प्राण वृक्षात बदलत आहेत.
मात्र शास्त्रज्ञांना अजूनही आशा आहे. क्षारयुक्त पाण्यापासून दूर झाडे लावायला हवीत, असे वनतज्ज्ञांचे मत आहे. कारण तसे केले तरच जंगले निर्माण होऊ शकतात, अन्यथा अशी निर्जन व भयावह जंगले पर्यावरणासाठी घातक ठरतील. या निर्जन जंगलांच्या मागे एक पर्यावरणीय व्यवस्था आहे जी सुधारली जाऊ शकते.


