हाथरस प्रकरण : “…अन्यथा पीडितेच्या कुटुंबियांना माझ्या घरी घेऊन जातो”

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी आज पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली

लखनौ – उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे अवघा देश हादरला आहे. या अमानवी घटनेबाबत सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून विविध पक्ष व संघटनांकडून याविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. अशातच आज भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

आझाद यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारकडे काही मागण्याही केल्या.

आझाद म्हणाले, “पीडितेच्या कुटुंबियांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात यावी अशी आमची मागणी आहे. सुरक्षा न दिल्यास मी त्यांना मी माझ्या घरी घेऊन जातो. ते (पीडितेच्या कुटुंबीय) इथं सुरक्षित नाहीयेत. याप्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी आहे.”


दरम्यान, सामूहिक बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरातील वातावरण चांगलेच तापले आहे. काल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणी सीबीआय चौकशीची घोषणा केली असून गुन्हेगारांना लवकरात लवकर कडक शासन केले जाईल असे आश्वासनही दिले आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.