हसन मुश्रीफांचा घोटाळा दाबण्यासाठी अटकेचे आदेश; सोमय्यांचे ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

मुंबई: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा घोटाळा उघड केल्यानंतर आता आपण विदर्भातील नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार होतो. हे रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगून माझा कोल्हापूर दौरा प्रतिबंधित केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.

सोमय्या म्हणाले की, माझ्या घराजवळ पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मुश्रीफ यांचा घोटाळा दाबण्यासाठीच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मला अटक करण्याचे आदेश दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

सोमय्या यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ते म्हणाले की, ठाकरे सरकारची दडपशाही सुरू असून माझ्या घराखाली पोलिसांची गर्दी आहे. आपला कोल्हापूर दौरा थांबविण्यासाठी घरातून अटक करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आदेश दिले आहेत, असा दावा त्यांनी केला.

परंतु, माझा दौरा थांबवण्याचा कितीही प्रयत्न करण्यात आला तरी मी आज महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला निघणारच. मी तेथे जाऊन कागल येथे असलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कारखान्याची पाहणी करणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले. तत्पूर्वी सोमय्या यांना कोल्हापुरात येऊ देऊ नका असा आदेश कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले असून तो आदेश पोलिसांनी आपल्याला दाखवला असल्याचे सोमय्या यांनी नमूद केलं.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.