BMC Election 2026 | शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची आज अखेर अधिकृतरित्या घोषणा झाली आहे. आज (24 डिसेंबर) मुंबईत एकत्र पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी युतीची घोषणा केली. ही युती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी मुंबईचा महापौर मराठी होणार आणि आमचाच होणार, असा निर्धार व्यक्त केला आहे. मात्र, युतीमधील जागावाटपाचे आकडे किंवा तपशील सध्या जाहीर करण्यात आले नाहीत. परंतु, या पत्रकार परिषदेपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक मोठं विधान केलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी शिवसेना-मनसेला किती जागांवर विजय मिळू शकतात, याबाबताच अंदाज वर्तवला आहे. तसेच आपल्याला या निवडणुकीत उमेदवारी मिळेल, असा विश्वा व्यक्त करत मी 100 टक्के माझ्या वॉर्डातून लढणार आहे, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर या शिवसेना-मनसे युतीच्या पहिल्या उमेदवार असण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत किशोरी पेडणकेर या दक्षिण मुंबईतील वॉर्ड क्रमांक 199 मधून निवडून आल्या होत्या आणि त्या मुंबईच्या महापौर झाल्या होत्या. मात्र, यंदा ठाकरे गटाकडून ज्येष्ठ नेत्यांऐवजी तरुण चेहऱ्यांना संधी देणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांची उमेदवारी धोक्यात असल्याचेही बोललले जात होते. मात्र, राज-उद्धव यांच्या युतीच्या घोषणेपूर्वी किशोरी पेडणेकर यांनी आपलं तिकीट फिक्स असल्याचा दावा केला आहे. त्या म्हणाल्या, मी स्वत: रणंगणात असेन. ठाकरे बंधू मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत 130 पेक्षा अधिक जागा जिंकतील. भाजपवाले आमच्यावर आरोप करत आहेत. त्यांनी आमच्यावर कधी आरोप केले नाहीत. आता ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आम्ही काय काम केलं, हे मुंबईकरांना माहिती आहे, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.