प्रभात वृत्तसेवा पुणे – सलग तिसऱ्या दिवशी किमान तापमानाचा पारा दोन अंशाने वाढल्यामुळे रविवारी (दि. २३) शहरातील तापमान १४ अंशाच्या पुढे गेले. परिणामी शहरासह जिल्ह्यातील थंडीचा कडाका कमी झाला आहे. मात्र, पहाटे आणि रात्री थंडी जाणवत आहे. पाषाण १६.२, शिवाजीनगर १६.७, कोरेगांव पार्क १९.५ असे किमान तापमान नोंदवले गेले. पुढील दोन दिवस शहरातील कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नसून, आकाश निरभ्र राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. हवामानातील बदलामुळे शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली. त्यामुळे १८, १९ नोव्हेंबरला पुण्यात आलेली थंडीची लाट ओसरली आहे. मागील मागील चार दिवसांत किमान तापमान पाच ते सहा अंशाने वाढल्याने थंडीची तीव्रता कमी झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात थंडी गायब झाली असून, डोंगर परिसर आणि धरणक्षेत्र परिसरात पहाटे आणि रात्री थंडी चांगली जाणवत आहे. पहाटे धुक्यांची चादर पसरते. किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानातही वाढ झाल्यामुळे दुपारी आकाश निरभ्र आणि उन्हाचा चटका जाणवत आहे. पुढील दोन दिवस हवामान कोरडे राहील, दुपारनंतर ढगाळ वातावरण असेल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. किमान तापमान पाषाण १६.२, शिवाजीनगर १६.७, कोरेगांव पार्क १९.५, चिंचवड १९.७, वडगांवशेरी २०.२, हवेली १४.४, माळीण १५.७, तळेगांव दाभाडे १५.८, दौंड १६.१, , आंबेगांव १६.३, बारामती १६.७, गिरीवन १७.९