Air Hostess Geetika Sharma Suicide Case : हरियाणाचे आमदार गोपाळ कांडा यांची निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली :- एअर होस्टेस गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणातून हरियाणाचे माजी गृहमंत्री आणि विद्यमान आमदार गोपाळ कांडा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने मंगळवारी 11 वर्षे जुन्या या प्रकरणाचा आज, मंगळवारी निकाल दिला. या प्रकरणात सहआरोपी अरुणा चढ्ढा यांचीही न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
न्यायालयाने नमूद केले की, गीतिका शर्माने अन्य कारणांमुळे आत्महत्या केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गीतिका शर्माचे आरोपी अरुणा चढ्ढा हिच्याशी मैत्रीपूर्ण संबंध होते. मृताची आरोपी अरुणा चढ्ढासोबतची मैत्री काही अनौपचारिक नव्हती. कलम 306 (आत्महत्येला प्रवृत्त करणे) 120-बी आयपीसी नुसार गुन्हा सिद्ध करण्यात फिर्यादी अयशस्वी ठरले आहे, असे न्यायालयाने नमूद केले.
गोपाळ कांडा यांच्या एअरलाइन्समध्ये एअर होस्टेस म्हणून काम करणाऱ्या गीतिकाने 5 ऑगस्ट 2012 रोजी दिल्लीतील घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यावेळी सुसाईड नोटही सापडली होती. यात गोपळ कांडा आणि त्यांच्या एमडीएलआर कंपनीतील वरिष्ठ व्यवस्थापक अरुणा चढ्ढा यांच्यावर छळ केल्याचा आरोप केला.
याप्रकरणी गोपाळ कांडा यांना अटक केल्यानंतर त्यांना 18 महिने तुरुंगात राहावे लागले. मार्च 2014मध्ये त्यांना जामीन मंजूर झाला. सहआरोपी अरुणा चढ्ढा हिला उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर कांडा यांनाही जामीन मंजूर करण्यात आला होता.
दरम्यान, गोपाल कांडा हे सिरसा (हरियाणा) येथून अपक्ष आमदार आहेत. 2009मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकली. त्यावेळी त्यांनी हुड्डा सरकारला पाठिंबा दिला आणि त्या बदल्यात त्यांना हरियाणात गृहमंत्री करण्यात आले होते. त्यानंतर 2012मध्ये एअर होस्टेस गीतिका शर्मा आत्महत्याप्रकरण समोर आल्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

